चिमुकलीच्या उपचारप्रकरणी रूग्णालय प्रशासन आणि नातेवाईकांमध्ये वाद; अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 03:26 PM2018-11-17T15:26:00+5:302018-11-17T15:27:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : येथील सिल्व्हर सिटी रूग्णालयात उपचार घेतलेल्या सहा वर्षीय चिमुकलीच्या उपचारप्रकरणी रूग्णालय प्रशासन आणि तिच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील सिल्व्हर सिटी रूग्णालयात उपचार घेतलेल्या सहा वर्षीय चिमुकलीच्या उपचारप्रकरणी रूग्णालय प्रशासन आणि तिच्या नातेवाईकांमध्ये वाद उद्भवला आहे. डॉक्टरांनी मृत घोषित केलेली चिमुकली जिवंत निघाल्याचा ‘पेच’ सुटता सुटत नसतानाच, रूग्णालय प्रशासनाकडून सामाजिक बदनामी केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तर डॉक्टरांनी सांगितल्यामुळेच चिमुकलीला रूग्णालयातून हलविल्याचा मुलीच्या आईचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील अर्पिता दीपक दाभाडे (६) या चिमुकलीचा गुरूवारी सायंकाळी एका वाहनाच्या धडकेमुळे अपघात झाल्यानंतर सिल्व्हरसिटी रूग्णालयात भरती करण्यात आले. शुक्रवारी ती मरण पावल्याचे डॉक्टरांनी तोंडी सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी घरी हलविले. अत्यविधीची तयारी सुरू असतानाच ती जिवंत असल्याचे समजले. त्यामुळे नातेवाईक आणि समाजमनात तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मुलीला रूग्णालयातून हलविल्याचा दावा नातेवाईकांनी केला. अर्पिताची आई सरला दाभाडे यांचा एक व्हीडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
अर्पितावर अकोला येथील रूग्णालयात उपचार!
अपघातात गंभीर जखमी असलेल्या अर्पिता दाभाडे (६) हीच्यावर अकोला येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच तिच्या नातेवाईकांनी तिला अकोला येथे हलविले.
डॉक्टर दिशाभूल करीत असल्याचा आरोप!
रूग्णालयातील डॉक्टर दिशाभूल करीत असल्याचा आरोप चिमुकलीच्या नातेवाईकांनी केला आहे. दोन कोºया वेगवेगळ्या कागदांवर पतीसह नातेवाईकांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या. त्यानंतर त्यावर मजकूर लिहीण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आता डॉक्टरांकडून दिशाभूल केल्याचा जात असल्याचा दावाही चिमुकलीच्या नातेवाईकांनी केला.
अज्ञात आरोपीविरोधात पोलिसात तक्रार!
अपघातात जखमी झालेल्या चिमुकलीवर सिल्व्हरसिटी हॉस्पीटलमध्ये १५ नोव्हेंबर रोजी योग्य ते उपचार करण्यात आले. मेंदूला जबर मार लागल्याने चिमुकलीच्या नातेवाईकांना तिच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देण्यात आली. तसेच तिला पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आल्याचेही सांगितले. १६ नोव्हेंबर रोजी तिच्या नातेवाईकांनी तिला रूग्णालयातून हलविले. या चिमुकलीच्या नातेवाईकांना कोणतेही मृत्यूप्रमाणपत्र देण्यात आले नाही. दरम्यान, या चिमुकलीच्या नातेवाईकांकडून बदनामी करण्यात आल्याची तक्रार सिल्व्हरसिटी हॉस्पीटलचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भगतसिंह राजपूत यांनी शहर पोलिसांत दिली. यावरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात कलम ५०५ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
सिल्व्हरसिटी रूग्णालयात भरती चिमुकलीवर योग्य ते उपचार करण्यात आले. तिच्या नातेवाईकांच्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही. योग्य ते उपचार केल्यानंतरही नातेवाईकांकडून चुकीची अफवा पसरविण्यात येत आहे. यासंदर्भात शहर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
-डॉ. भगतसिंह राजपूत
मुख्य कार्यकारी अधिकारी, सिल्व्हरसिटी हॉस्पीटल, खामगाव.