रेल्वे अपघातातील युवकाच्या प्रेताची अवहेलना, नातेवाईकांचा आक्रोश
By admin | Published: February 8, 2017 01:30 PM2017-02-08T13:30:28+5:302017-02-08T13:32:57+5:30
मालगाडीची धडक लागून मृत्यूमुखी पडलेल्या एका युवकाच्या प्रेताची अवहेलना झाल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी सकाळी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात उघडकीस आला.
Next
>रेल्वे पोलिसांच्या संवेदनशीलेवर प्रश्नचिन्ह
फहीम देशमुख, ऑनलाइन लोकमत
शेगाव, (जि. बुलडाणा), दि. ८ - मालगाडीची धडक लागून मृत्यूमुखी पडलेल्या एका युवकाच्या प्रेताची अवहेलना झाल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी सकाळी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात उघडकीस आला. या प्रकारामुळे रेल्वे पोलिसांच्या संवेदनशीलतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मृतकाच्या नातेवाईकांनी आक्रोश करीत, संबधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील गंगाप्रसाद विश्वनाथ क्षीरसागर(२५) या युवकाला मंगळवारी रात्री ८.३० वाजता डाऊन ट्रॅकवर मालगाडीची धडक बसली. यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती नागझरी येथील रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर योगेश लोणकर यांना मिळताच, त्यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळ गाठले. रेल्वे प्रशासनाची विशेष परवानगी घेवून रात्री ८.३० वाजता मुंबई- हावडा मेल थांबविण्यात आली. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या गंगाप्रसाद क्षीरसागर याला शेगाव रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. त्याचवेळी शेगाव स्थानकावर रुग्णवाहिका उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र रेल्वे डॉक्टरांनी त्या युवकाला मृत घोषित केले. ब-याच प्रतीक्षेनंतरही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने, अखेरीस रेल्वे पोलिसांनी सदर युवकाच्या मृतदेहास एका आॅटोद्वारे शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात हलविले. या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांचा कोणताही सल्ला न घेता, रेल्वे पोलिसांनी सदर युवकाचे प्रेत थेट शवागारात नेले. शवागारात प्रेत व्यवस्थित ठेवण्यात न आल्याने, प्रेताची अवहेलना झाली. मुंग्या लागल्याने मृतदेहाचे दोन्ही डोळे मुंग्यांनी खाल्ल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नातेवाईकांनी आक्रोश संताप व्यक्त केला. याप्रकरणी रेल्वे पोलिस स्टेशनचे ठाणेदार एम.डी.परदेशी यांना घेराव घालत, प्रेताची अवहेलना करणा-या संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली.