मातृतीर्थाच्या औद्योगिक विकासात ‘विघ्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 11:03 AM2021-05-27T11:03:12+5:302021-05-27T11:03:20+5:30
Buldhana News : पायाभूत सुविधा उपलब्ध करताना नियमांवर अवाजवी बोट ठेवल्या जात असल्याने उद्योजकांना या पट्ट्यात अडचणी येत आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : समृद्धी महामार्ग आणि जालन्यातील ड्रायपोर्टमुळे दळणवळणासह अैाद्योगिक विकासाची मोठी संधी सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात निर्माण होत आहे. पण पायाभूत सुविधा उपलब्ध करताना नियमांवर अवाजवी बोट ठेवल्या जात असल्याने उद्योजकांना या पट्ट्यात अडचणी येत आहे. त्यातूनच सिंदखेड राजातील उद्योजकाने ५० कोटी रुपयांचा खाद्य प्रक्रिया उद्योग अन्यत्र उभारण्याचा निर्णय घेतल्याने मातृतिर्थ सिंदखेड राजा परिसरातील विकास प्रक्रियेत प्रारंभालाच ‘विघ्न’ येत असल्याचे चित्र आहे.परिणामी आगामी दशकात अैाद्योगिक विकासासाठी एक महत्त्वाचे ठिकाण ठरू पाहणाऱ्या सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा तालुक्यातील पायाभूत सुविधांवर आताच लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजातील आऊटलेटमधूनच उद्योजक अन्य ठिकाणी उद्योग उभारण्यास प्राधान्य देतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भातील भीती सिंदखेडराजाचे भूमिपुत्र संजय वायाळ यांनीच व्यक्त केली आहे. अैाद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या बुलडाणा जिल्ह्यात नव्याने विकसित होऊ शकणाऱ्या सिंदखेडराजा, देऊळगावराजा टापूतील अैाद्योगिक विकासाला चालना देण्याची अवश्यकता आहे.
नवनगराच्या कामाला वेग देण्याची गरज
सिंदखेडराजा आणि मराठवाड्याच्या सीमेवर माळ सावरगाव, वाडेगाव आणि निमखेड येथील नवनगर उभारण्याच्या हालचालींना त्यामुळे आता वेग देण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या या तीन गावांपैकी माळ सावरगाव येथील १९०० हेक्टर व अन्य एका गाातील १२ हेक्टर जमिनीची मोजणी झाली आहे. मात्र भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. त्यामुळे याला आता वेग देण्याची गरज आहे. या तिन्ही गावांचे ड्रोन सर्वेक्षण झालेले आहे.
ड्रायपोर्ट ठरणार महत्त्वाचा दुवा
समृद्धी महामार्गालत माळ सावरगाव येथे उभे राहणाऱ्या नवनगरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर जालना जिल्ह्यातील दरेगाव येथे ड्रायपोर्टचे काम ४० टक्क्यांच्या पुढे झाले आहे. रेल्वेचे रुळही ड्रायपोर्टपर्यंत येत आहे. आगामी तीन वर्षात हे ड्रायपोर्ट प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ शकते. त्यामुळे पुढील टप्प्यात सिंदखेडराजा, देऊळगावराजा या दोन तालुक्यांचे अैाद्योगिकदृष्ट्या महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे संधी कॅश करण्यासाठी आता खऱ्या अर्थाने राजकीय इच्छाशक्तीचा जोर लावण्याची गरज आहे. यास भरीसभर म्हणून १६० दलघमी म्हणजे जवळपास ४.५३ टीएमसी क्षमतेचा खडकपूर्णा प्रकल्पही आहे. त्यामुळे उद्योगासाठी आवश्यक पाणीही येथे उपलब्ध आहे.
सीड हबलाही हवा ‘ऑक्सिजन’
जालना जिल्ह्यालगत असलेली देऊळगावराजा, सिंदखेडराजा आणि लोणार हे तिन्ही तालुके जिल्ह्यासाठी सीड हब आहेत. यासाठी गेल्या युती शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी ६० कोटी रुपयांची घोषणा केली होती. मात्र कोरोनाच्या विघ्नामुळे सीड हब विकसित होण्यातही विघ्न आले आहे.
समृद्धी महामार्गामुळे महत्व वाढणार
नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गामुळे सिंदखेडराजाचे महत्व वाढणार आहे. महामार्गावरून बाहेर पडण्यास या परिसरातच आऊटलेट देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह परिसरातून वाहतूक सिंदखेडराजा परिसरात केंद्रीत हाेण्याची शक्यता आहे. त्याचाही उघाेग व्यवसाय वाढीला फायदा हाेऊ शकताे. तसेच दिल्ली येथील हायस्पीड रेल्वे कार्पेारेशन अंतर्गत समृध्दी लगतच हवाई सर्वेक्षण झाले आहे.