जि. प. कन्याशाळेच्या स्वयंपाकगृहाला आग, शाळेतील शिक्षकांच्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळला
By योगेश देऊळकार | Published: August 10, 2023 06:03 PM2023-08-10T18:03:19+5:302023-08-10T18:05:07+5:30
कन्या शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींना दररोज पोषण आहाराचे वाटप करण्यात येते.
जलंब : येथील जि. प. कन्या शाळेतील गॅस सिलिंडरची नळी लिकेज असल्याने स्वयंपाकगृहाला आग लागली. या आगीत अन्नधान्यासह संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. ही घटना १० ऑगस्ट रोजी १२:०० वाजता घडली. शिक्षकांच्या समयसूचकतेमुळे खूप मोठा अनर्थ टळला.
कन्या शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींना दररोज पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. याकरिता शाळेत स्वयंपाकगृह असून, पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील गॅस सिलिंडरची नळी लिकेज असल्याचे पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांच्या लक्षात न आल्याने गुरूवारी अचानक शाळेला आग लागली. हा प्रकार लक्षात येताच शिक्षकांनी विद्यार्थिनींना तातडीने वर्गखोल्यांच्या बाहेर काढले.
पोलिस स्टेशन हाकेच्या अंतरावर असल्याने ठाणेदार अमाेल बारापात्रे, संदीप गावंडे व सचिन बावणे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पं. स. सदस्य विठ्ठल सोनटक्के, सुरेश गव्हांदे, संजय राजपूत यांच्यासह गावकऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. शाळेला लागूनच रहिवासी वस्ती असल्याने हा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडण्याची शक्यता होती. मात्र, आग वेळीच आटोक्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.