कर्तृत्ववान महिलांचा ‘सखी सन्मान’ पुरस्काराने गौरव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:57 AM2017-11-23T00:57:35+5:302017-11-23T00:58:05+5:30
स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित शानदार सोहळ्यात लोकमत सखी मंचच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा ‘सखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : भारतीय महिलांनी जगभर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. भारतीय संस्कृती ही महिलांनमुळे खर्या अर्थाने टिकून आहे. अशा या महिलांपैकी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या जिल्हय़ातील महिलांच्या कार्याचा ‘लोकमत’च्यावतीने हा सन्मान करण्यात आला. हा सन्मान म्हणजे या महिलांच्या कार्याची ही घेतलेली दखल आहे, असे मत बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी येथे व्यक्त केले.
स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित शानदार सोहळ्यात लोकमत सखी मंचच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा ‘सखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर बुलडाणा पाटबंधारे मंडळाच्या उपकार्यकारी अधिकारी अभियंता क्षितिजा गायकवाड उपस्थित होत्या.
बुलडाणा अर्बनच्या कामानिमित्त जगभर भ्रमंती करताना भारतीय महिलांनी केलेल्या कार्याची जाणीव प्रत्येक ठिकाणी झाल्याचे ते म्हणाले. भारतीय स्त्री ही सृजनशील व धाडसी आहे. त्यामुळेच त्यांच्या हातून अलौकिक कार्य झाले असल्याचे ते म्हणाले. सुसंस्कृत समाज निर्मितीमध्ये महिलांचे मोठे योगदान असल्याचेही ते म्हणाले. पाटबंधारे मंडळाच्या उपकार्यकारी अभियंता क्षितिजा गायकवाड यांनी सामाजिक बांधीलकीच्या दृष्टिकोनातून ‘लोकमत’ने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. महिलांच्या कार्यकर्तृत्वाच्या या गौरव समारंभाने आपण भारावून गेल्याचे त्या म्हणाल्या. यासोबतच महिला सक्षमीकरणासंदर्भातही त्यांनी त्यांची भूमिका मांडली. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन विविध क्षेत्रात चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. अशा कार्यात सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याचेही त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकात ‘लोकमत’चे नीलेश जोशी यांनी पुरस्कारामागील भावना विशद करून महिला सक्षमीकरणासाठी ‘लोकमत’च्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सन्मान करण्यात आलेल्या सखींनीही त्यांचे मनोगत व्यक्त करीत काम करीत असताना आलेल्या अडीअडचणी व त्यावर कशी मात केली, याबाबत सांगितले. विविध क्षेत्रातील नागरिकांसह महिलांची कार्यक्रमाला मोठी गर्दी होती.
सखी सन्मान पुरस्कार विजेते
जीवनगौरव - डॉ. इंदूमती लहाने
सामाजिक - प्रेमलता सोनोने
आरोग्य - भावना कॅम्बेल
क्रीडा - डॉ. कामिनी मार्मडे
साहित्य - गोदावरी पाटील