पात्र शेतकऱ्यांना गतीने पीक कर्ज वाटप करा : शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:26 AM2021-06-06T04:26:00+5:302021-06-06T04:26:00+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात खरीप हंगाम पीक कर्ज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, जि.प ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात खरीप हंगाम पीक कर्ज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्षा मनीषा पवार, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, आ. संजय गायकवाड, श्वेता महाले, राजेश एकडे, जि. प. सीईअेा भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा काही बँका शेतकऱ्यांना लाभ देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या योजनेचा पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा, असे डॉ. शिंगणे यांनी स्पष्ट केले. सोबतच गेल्या पाच वर्षांचे बँकांचे रेकॉर्ड तपासून ज्या बँकांनी योजनेचा लाभ दिला नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. बँकांनी पीक कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती शाखेच्या दर्शनी भागात फलकावर किंवा बॅनरवर लावावी. पीक कर्ज वितरण करताना उद्धट वागणूक देऊ नये, असेही स्पष्ट केले. जिल्हा बँकेमार्फत लाभ मिळालेल्या; परंतु कर्ज वाटप न झालेल्या प्रत्येक सभासदाला संलग्न राष्ट्रीयीकृत बँकेने कर्जवाटप करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खा. जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांनी कर्जासाठी अर्ज व कागदपत्रे सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना अर्ज दिल्याची पोचपावती द्यावी, असे स्पष्ट केले. सोबतच उपस्थित आमदारांनी पीक कर्ज वाटपासंदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीची माहिती दिली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा उपनिबंधक राठोड, जिल्हा बँकेचे सीईअेा अशोक खरात यांच्यासह अन्य उपस्थित होते.