बुलडाणा जिल्ह्यात १८२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 11:33 AM2021-06-02T11:33:41+5:302021-06-02T11:33:50+5:30
Crop Loan : जिल्ह्यातील २० हजार ९८८ शेतकऱ्यांना बँकांनी १८२ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जून महिन्याच्या मध्यावर बुलडाणा जिल्ह्यात मान्सूनचे साधारणत: आगमन होत असते. त्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी पीक कर्जसाठी लगबग सुरू केली आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील २० हजार ९८८ शेतकऱ्यांना बँकांनी १८२ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे.
या वर्षी जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना एक हजार ३०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट या वर्षी कमी करून देण्यात आले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ३४० शेतकऱ्यांना एक हजार २५५ कोटी रुपयांचे पीक कर्ज बँकांनी वाटप केले होते. यंदा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ९०४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यंदा मिळालेले असून, ९७ हजार ६५० शेतकऱ्यांना या बँकांना हे पीक कर्ज द्यावे लागणार आहे. त्यापैकी मे अखेर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दहा हजार ४३६ शेतकऱ्यांना ९५ कोटी ३ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दिलेल्या एकूण उद्दिष्टाच्या ११ टक्के उद्दिष्ट गेल्या दोन महिन्यांत या बँकांनी पूर्ण केले आहे. खासगी क्षेत्रातील बँकांना या वर्षी ४ हजार ३५० शेतकऱ्यांना ८२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी प्रत्यक्षात बँकांनी आतापर्यंत ४७३ शेतकऱ्यांना ८ कोटी ८६ लाख २४ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. ग्रामीण बँकेनेही दिलेल्या उद्दिष्टाच्या १८ टक्के पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले असून, ४ हजार ५०१ शेतकऱ्यांना ४३ कोटी ९० लाख रुपयांचे पीक कर्ज दिलेले आहे.