कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना देशी झाडांचे वाटप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:26+5:302021-05-03T04:29:26+5:30
चिखली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात प्रामुख्याने जाणवत असलेला ऑक्सिजन तुटवडा आणि त्याचे महत्त्व आता सर्वांनाच कळले आहे. हाच ...
चिखली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात प्रामुख्याने जाणवत असलेला ऑक्सिजन तुटवडा आणि त्याचे महत्त्व आता सर्वांनाच कळले आहे. हाच धागा पटवून प्राणवायूचे उत्सर्जन करणाऱ्या देशी झाडांचे महत्त्व पटावे व त्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड होऊन निसर्गाचा समतोल राखला जावा, या उदात्त हेतूने येथील निसर्ग समृद्ध संस्थेच्या वतीने कोरोनातून बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांना देशी झाडांचे वाटप केले आहे.
प्राणी, माणूस अन्न पाण्याशिवाय दोन दिवस ही जगू शकतो, परंतु ऑक्सिजनविना दोन मिनिटेही जगणे आवघड असल्याने, त्याचे महत्त्व कोरोनामुळे सर्वांना कळले आहे. ऑक्सिजनच्या अभावी लाखों लोकांचा जीव घेतला आहे. १३० करोड लोकसंख्येचा आपला देश पाच टक्के लोकांना ऑक्सिजन पुरवू शकत नाही. जगात कोणताच देश ऑक्सिजन पुरवू शकत नाही, ही किमया आणि अफाट शक्ती फक्त निसर्गातच आहे. आपल्या स्वार्थासाठी जंगलतोड करताना मानव वृक्षलागवड करण्यास विसरला. मोठ्या शहरात शुद्ध हवा व प्रदूषणमुक्त वातावरण नसल्याने विविध आजार उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत शुद्ध हवा, पाणी, प्रदूषणमुक्त वातावरणसह निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संगोपन अती महत्त्वाची बाब असून, हेच निदर्शनात आणण्यासाठी गेल्या वर्षभरापासून वृक्षारोपण व संवर्धनसाठी झटणाऱ्या निसर्ग समृद्धी संस्थेच्या वतीने चिखली शहरातील खासगी कोरोना रुग्णालयात कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर डिस्चार्ज घेऊन घरी जात असलेल्या चार रुग्णांना पिंपळ, उंबर, सीताफळ, असे देशी प्रजातीचे झाडे देऊन वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देण्यात आला. दरम्यान, चिखली शहरातील नागरिकांनी उन्हाळ्यात आंबे, चिंच, बिबे या व इतर देशी व विदेशी जातीचे बी फेकून न देता, पावसाळी वृक्ष लागवडीसाठी जमा करून निसर्ग समृद्धी संस्थेला द्यावेत, जेणेकरून येत्या पावसाळ्यात त्यांची लागवड केली जाईल, असे आवाहनही निसर्ग समृद्धी संस्थेने या पृष्ठभूमीवर केले आहे.