जिल्ह्यातील रुग्णालयांना एक हजार रेमडेसिविरचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:33 AM2021-05-01T04:33:32+5:302021-05-01T04:33:32+5:30
२९ एप्रिल रोजीची रुग्णालयांना बेड व रुग्णसंख्येनुसार हे वितरण करण्यात आले. कोविड केअर सेंटर, खासगी आणि शासकीय रुग्णालयातील एकूण ...
२९ एप्रिल रोजीची रुग्णालयांना बेड व रुग्णसंख्येनुसार हे वितरण करण्यात आले. कोविड केअर सेंटर, खासगी आणि शासकीय रुग्णालयातील एकूण रुग्ण व रेमडेसिविरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या याची सविस्तर माहिती घेऊन हे वितरण करण्यात आले. रेमडेसिविर इंजेक्शनचे न्यायतत्त्वानुसार वितरण होत नाही, अशी अेारड होती. त्यातच बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड यांनीही एफडीएच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्या पार्श्वभूमीवर २९ एप्रिल रोजी हे एक हजार इंजेक्शन जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात ज्या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार होत आहेत, अशा रुग्णालयांना देण्यात आले.
--१० टक्के साठा राखीव--
जिल्ह्यास रेमडेसिविर इंजेक्शनच्या प्राप्त झालेल्या साठ्यापैकी १० टक्के साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हा साठा फ्रंटलाईन वर्कर तथा डॉक्टर्स, इतर कर्मचारीवर्ग तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्याकरिता शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिलेल्या आदेशान्वये राखीव ठेवण्यात आलेला आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी सदर औषधाचा वापर हा योग्यरीत्या व अत्यावश्यक असलेल्या रुग्णांकरिताच प्राधान्याने करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण अहिरे यांनी स्पष्ट केले आहे.