जिल्हा सामान्य रुग्णालयात मुदतबाह्य औषधांचे वाटप!

By Admin | Published: May 17, 2017 01:26 AM2017-05-17T01:26:07+5:302017-05-17T01:26:07+5:30

रुग्णांची हेळसांड : वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Distribution of outdated medicines at District General Hospital | जिल्हा सामान्य रुग्णालयात मुदतबाह्य औषधांचे वाटप!

जिल्हा सामान्य रुग्णालयात मुदतबाह्य औषधांचे वाटप!

googlenewsNext

नीलेश शहाकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिसारचे रुग्ण वाढत आहेत. अशा रुग्णांना प्राथमिक उपचार म्हणून वैद्यकीय सल्ल्यानुसार ओआरएस पावडरचे पाणी पाजले जाते; मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात ओआरएस पावडरचे पाकीट उपलब्ध नाही. जे पावडर उपलब्ध आहे, ते मुदतबाह्य आहे. त्यामुळे अतिसाराच्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आला.
जिल्ह्यातील जलसाठा अल्प असून, बऱ्याच ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. वाढलेले तापमान व दूषित पाणी पिण्याने ग्रामीण भागात अतिसाराचे रुग्ण आढळून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय उपचाराचा स्वस्त पर्याय असल्यामुळे येथे ग्रामीण रुग्णांची गर्दी आहे. यात विशेषकरून ० ते ५ वर्षे वयोगटातील अतिसार झालेल्या बाल रुग्णांना प्राथमिक उपचार म्हणून ओआरएसचे पाणी पाजण्याचा सल्ला वैद्याकीय अधिकारी देतात.यासंदर्भात लोकमत प्रतिनिधींनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन अतिसार रुग्ण व उपचाराबाबत चौकशी केली असता, रुग्ण अतिसारासाठी उपचार घेण्यासाठी आले असल्याचे आढळून आले. त्यांच्या उपचार पावतीवर ‘ओआरएस पावडर घ्या’, अशी वैद्यकीय टीप डॉक्टरांनी लिहून दिली होती; मात्र औषध वाटप कर्मचाऱ्याकडे सदर पावडर पाकीट उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागला.

रुग्णांकडे आढळले मुदतबाह्य पाकीट
औषध वाटप कर्मचाऱ्याकडे ‘ओआरएस’ न मिळाल्यामुळे रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांकडे सदर पावडर केव्हा उपलब्ध होईल, अशी चौकशी करण्यात आली. आमच्याकडे मुदतबाह्य ओआरएस पावडर आहे; मात्र ते रुग्णास देण्यास मनाई करण्यात आली आहे. नवीन पावडर केव्हा उपलब्ध होईल, ही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले; मात्र एका ग्रामीण रुग्णाकडे मुदत संपलेले ओआरएस पाकीट आढळून आले.

वैद्यकीय अधिकारी अनभिज्ञ
अतिसार झालेल्या रुग्णांना ओआरएस पावडर घेण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून बेधडकपणे लिहून दिला जातो; मात्र रुग्णालयातील औषध भांडारात ओआरएसचे नवीन पाकीट उपलब्ध आहे किंवा नाही, याची साधी चाचपणीही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून केली जात नाही. त्यामुळे वैद्यकीय सेवा व सुविधेपासून बरेच आरोग्य कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे आढळून आले.

असे झाले स्टिंग आॅपरेशन
- सकाळी १० वाजताच्या सुमारास निनावी रुग्णाच्या नावाने ओपीडीमधून १० रुपये शुल्क भरून उपचारासाठी पावती काढण्यात आली.
- सदर पावती आरोग्य कर्मचाऱ्याला दाखवून ‘ओआरएस पावडर पाहिजे’, अशी मागणी करण्यात आली.
- रुग्णाची कोठलीही चौकशी व तपासणी न करता, कर्मचाऱ्याने सहा ‘ओआरएस’चे पाकीट पावतीवर लिहून दिले.
- पावती औषध वाटप कर्मचाऱ्याला दिली. तेव्हा रुग्णालयात सदर पावडर उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.
- यानंतर रुग्णालयात फेरफटका मारला असता, एका ग्रामीण रुग्णांच्या नातेवाइकाकडे मुदतबाह्य ओआरएस पावडरचे पाकीट आढळून आले.

Web Title: Distribution of outdated medicines at District General Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.