चिंचोलीत पोलीस बंदोबस्तात पाणी वितरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:00 AM2019-05-20T09:00:42+5:302019-05-20T09:01:21+5:30
अत्यल्प पावसामुळे चिंचोलीतील विहिरी , बोअरवेल, नाले कोरडेठण्ण पडले असून परिसरातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटलेत.
- अनिल उंबरकर
शेगाव: तालुक्यातील चिंचोली (कारफार्मा) येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाकडून टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात येत आहे. दरम्यान, पाण्यासाठी होत असलेली भांडणं आणि संघर्ष पाहता पोलीस बंदोबस्तात टँकरच्या पाण्याचे वितरण करण्यात येत आहे.
अत्यल्प पावसामुळे चिंचोलीतील विहिरी , बोअरवेल, नाले कोरडेठण्ण पडले असून परिसरातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटलेत. ऐन पावसाळ्यातही या ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष कायम होता. त्यामुळे सरपंच संजय इंगळे यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक संजय हाके यांनी पंचायत समिती व तहसिल कार्यालयात पाणी टंचाईचा अहवाल सादर केला. जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निदर्शनासही ही बाब आणून दिली. त्यानंतर या गावात पाण्याचे टँकर सुरू झाले. मात्र, टँकरचे पाणी भरण्यासाठी होत असलेली चढाओढ आणि संघर्ष पाहता याठिकाणी पोलिस बंदोबस्तात पाण्याचे वितरण करण्यात येत आहे.
टँकर गावात येण्यापूर्वीच लागतात रांगा!
पाण्याचा टँकर गावात येण्यापूर्वीच सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरापासून नागरिक या टँकर झडप मारतात. यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता, तसेच सर्वांना समान पाणी वाटपासाठी याठिकाणी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात टँकर द्वारे पाणी वितरण करण्यास सुरुवात झाली आहे.
गावातील स्थिती पाहता पाण्यासाठी वाद विकोपाला जावू नये, गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता पोलीस बंदोबस्त मागितला असून, पोलिस बंदोबस्तातच पाणी वितरीत केले जात आहे.
-पी.आर.वाघ
गटविकास अधिकारी
पंचायत समिती ,शेगाव