जिल्हा बँक शुक्रवार, शनिवारीही सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:03+5:302020-12-25T04:28:03+5:30
जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून, त्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. ३१ ...
जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून, त्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीतही उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च उमेदवारांना दर दुसऱ्या दिवशी निवडणूक विभागाकडे सादर करावा लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र खाते निवडणूक रिंगणातील उमेदवारांना उघडावे लागणार आहे. मात्र, सलग दोन दिवस सुट्या आल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांना त्यांचे स्वतंत्र खाते बँकेत उघडण्यात अडचण येण्याची शक्यता पाहता जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने जिल्ह्यातील त्यांच्या सर्व शाखा या नाताळ आणि महिन्याच्या चौथ्या शनिवारी अर्थात २५ डिसेंबर व २६ डिसेंबर रोजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणूक रिंगणातील उमेदवारांना २५ हजार ते ५० हजार रुपयांदरम्यान निवडणूक खर्च करण्याची मर्यादा आहे. यामध्ये ७ ते ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवाराला २५ हजार, ११ ते १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील उमेदवाराला ३५ हजार आणि १५ ते १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहणाऱ्या सदस्याला ५० हजार रुपये खर्च मर्यादा राहणार आहे. जिल्ह्यात ५२७ ग्रामपंचायतींमध्ये ४,७५१ सदस्य संख्येसाठी निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.