म्युकरमायकोसिस औषधी वितरणावर आता जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 11:28 AM2021-05-23T11:28:54+5:302021-05-23T11:29:03+5:30
Mucomycosis : ॲफ्कोटेरीसीन या अैाषधाचेही वितरण जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या नियंत्रणात घेत आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरानाबाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर, टोसिलिझुआन अैाषधानंतर आता म्युकरमायकोसिसच्या इलाजासाठी आवश्यक असलेले ॲफ्कोटेरीसीन या अैाषधाचेही वितरण जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या नियंत्रणात घेत आहे.
म्युकरमायकोसिस आजाराच्या अैाषधांचाही काळाबाजार होण्याची तथा त्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता पाहता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी या अैाषधांचे वितरण करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.
मुळातच म्युकरमायकोसिसच्या इलाजासाठी आवश्यक असलेली औषधी व इंजेक्शन ही महागडी आहेत. किमान दोन हजार रुपये ते २० हजार रुपयांपेक्षाही अधिक किमतीचे हे इंजेक्शन आहे. त्यातील घटकानुसार या इंजेक्शनचीही किंमतही वाढत जाते. त्यातच वर्तमान स्थितीत त्याचा असलेला तुटवडा पाहता जिल्ह्यातही काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी प्रशासकीय पातळीवर इंजेक्शन वितरणाचे नियंत्रणही घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच या इंजेक्शनसाठी आवश्यक असलेले घटक किंवा कच्चा माल हा परदेशातून घ्यावा लागतो. बुरशीजन्य आजाराचे प्रमाण अलीकडील काळात वाढले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने रेमडेसिविरप्रमाणेच म्युकरमायकोसिसच्या आजारारामध्ये लागणारे इंजेक्शनही आपल्या नियंत्रणात घेतले असून केंद्र सरकार ते राज्य सरकारांना वितरण करणार आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावरही जिल्हाधिकारी यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून इंजेक्शन वितरणावरील नियंत्रण आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
म्युकरमायकोसिसमुळे चार जणांचा मृत्यू
बुलडाणा जिल्ह्यातही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या २७ पर्यंत पोहोचली असून, यातील चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच बुलडाणा जिल्ह्यात तीन रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. या आजाराचा मृत्यूदर हा जवळपास ५० टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे या आजाराचे गांभीर्य वाढले असल्याचे सूत्रांनी सांगितले.