ग्रामपंचायत स्तरावर आयसोलेशन सेंटर उभारण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:37 AM2021-04-28T04:37:58+5:302021-04-28T04:37:58+5:30
यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी २४ व २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन अनुषंगिक विषयावर ...
यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी २४ व २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन अनुषंगिक विषयावर चर्चा केली होती. त्यातच संदर्भीय विषयान्वये नंतर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या गंभीर विषयाची दखल घेत अनुषंगिक कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानुषंगाने हे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनीही संवर्ग विकास अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ग्रामपंचायत स्तरावर आयसोलेशन सेंटर उभारण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद यंत्रणेला अवगत केले आहे. कष्टकरी व शेतकरीवर्गाचा सध्याचा कोरोना संसर्ग काळातील संघर्ष पाहता तुपकर यांनी ही मागणी सातत्याने रेटून धरली होती. त्याचे हे फलित म्हणावे लागले. पालकमंत्र्यांनी निर्देश देताच ही आयसोलेशन सेंटर उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच लक्षणे नसलेले तथा गंभीर नसलेले रुग्ण आपल्याला काहीच झाले नसल्याचे सांगत गावात फिरतात. त्यातून संक्रमणाचा धोका निर्माण होता. त्यानुषंगाने अशा व्यक्तींना आता आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. गावात पुरेशी जागा असलेली समाजमंदिरे, शाळा, मंगलकार्यालये या ठिकाणी हे सेंटर उभारण्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
--गावपातळीवर समितीही स्थापणार
गावपातळीवर आरोग्यसेवकांना स्थापन करण्यात येणाऱ्या समितीचे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यांच्यासोबतच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, पोलीसपाटील, आशा वर्कर्स यांचा समावेश समितीमध्ये राहील. लक्षणे नसलेले रुग्णांना या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. तेथे बेड, पाणी, फॅन व इतर सुविधा समितीला द्याव्या लागतील. या कक्षात आरोग्यसेवक, आशा वर्कर्स यांच्यामार्फत रुग्णांचे थर्मल स्कॅनिंगद्वारे ताप, ऑक्सिजनची पातळी नियमित तपासल्या जाईल, असेही अनुषंगिक आदेशात स्पष्ट केले आहे.