जिल्हाधिकाऱ्यांची सैलानीला भेट; मनोरुग्णांची नोंद ठेवण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 05:53 PM2019-08-16T17:53:09+5:302019-08-16T17:53:33+5:30
जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी प्रसिद्ध सैलानी बाबा दर्ग्याला १६ आॅगस्ट रोजी अचानक भेट देऊन पाहणी केली.
पिंपळगाव सराई: बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध सैलानी बाबा दर्ग्याला जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी १६ आॅगस्ट रोजी अचानक भेट देऊन पाहणी केली. सोबतच येथील मनोरुग्णांची नोंद ठेवण्याच्या सुचना रायपूर पोलिसांना दिल्या. या व्यतिरक्त यात्रा परिसरात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भानेही ठिकठिकाणी फलक लावण्याबाबत त्यांनी सुचित केले. दुसरीकडे पोळा सणाच्या पृष्ठभूमीवर सैलानी येथे होणारी गर्दी पाहता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही यंत्रणांनी नियोजन करण्याबाबत त्यांनी प्रशासनास सुचना दिल्या. सैलानी येथील होळीच्या मैदानाचीही यावेळी त्यांनी प्रामुख्याने पाहणी केली. मात्र अचानक त्यांनी सैलानी येथे भेट दिल्याने सध्या हा विषय चर्चेचा ठरत आहे. दरम्यान, सैलानी येथे येणाºया मनोरुग्णांची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था तथा सैलानी येथे ते कसे राहतात याबाबतही त्यांनी विचारपूस करून दर्गा परिसराची पाहणी केली. सोबतच परिसरात सैलानी ट्रस्टने अंधश्रद्धा निर्मूनासंदर्भात जागृती व्हावी, यादृष्टीकोणातून फलकही लावावेत, अशा सुचना दिल्या. दुसरीकडे सैलानी यात्रा, पोळा आणि आमावस्येच्या दिवशी किती भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यांच्या संख्येसंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोबतच रायपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष दुधळे यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली. परिसरात होणाºया मृत्यूंच्या संदर्भातही त्यांनी विचारपूस करून पोलिसांनी येथे येणाºया मनोरुग्णांसमवेत मृत्यू पावणाºयांचीही माहिती ठेवण्याबाबत रायपूर पोलिसांना निर्देशीत केले. पोलिसांकडे याबाबतची नोंदण असणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. सैलानी येथे मनोरुग्णांसाठी हॉस्पीटल उभारण्याबाबतचीही गेल्या काही काळापासून मागणी आहे. त्यासंदर्भाने चर्चेदरम्यान आलेल्या मुद्द्याला अनुसरून हे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी पाहणी दरम्यान दिले. यावेळी त्यांच्यासमवेत तहसिलदार संतोष शिंदे, रायपूरचे ठाणेदार सुभाष दुधळे, हाजी हाशम मुजावर, तलाठी प्रकाश उबरहंडे, माजी सरपंच रफीक मुजावर, पोलिस हेडकॉन्स्टेबल विजय पैठणे, गजानन माळी, नजीर मुजावर शेख नफीस प्रामुख्याने उपस्थित होते.