आरटीपीसीआर टेस्टमध्ये पश्चिम विदर्भात जिल्हा आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:34 AM2021-04-10T04:34:20+5:302021-04-10T04:34:20+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. कोरोना टेस्ट करणाऱ्यांचे प्रमाणही आता वाढलेले आहे. त्यामुळे बाधितांचा आलेख झपाट्याने वाढत ...
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. कोरोना टेस्ट करणाऱ्यांचे प्रमाणही आता वाढलेले आहे. त्यामुळे बाधितांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या ३९ दिवसांमध्ये १ लाख ४० हजार २३१ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. आरटीपीसीआर टेस्टमध्ये पश्चिम विदर्भात जिल्हा आघाडीवर आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कोरोना तपासणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. सध्या कोविड सेंटरमध्ये नव्हे, तर खासगी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथिमिक आरोग्य केंद्र याठिकाणी कोरोना तपासणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रॅपिड टेस्टचे शिबिर घेण्यात येत आहे. गावागावांत कोरोना तपासणी मोहीम सुरू आहे. त्यामुळे बाधितांचा आकडाही वाढत आहे. जिल्ह्यात १ मार्च २०२१ पासून आतापर्यंत १ लाख ४० हजार २३१ कोरोना तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात होणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्या सर्वाधिक आहेत. तपासणीबरोबरच पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाणही बुलडाणा जिल्ह्यात अधिक आहे.
अमरावती विभागातील २४ टक्के चाचण्या बुलडाण्याच्या
अमरावती विभागामध्ये १ मार्च २०२१ पासून आतापर्यंत ५ लाख ७६ हजार ४२० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २४ टक्के चाचण्या बुलडाणा जिल्ह्याच्या आहेत. तर सर्वांत कमी चाचण्या वाशिम जिल्ह्यातून करण्यात आलेल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात अवघ्या १३ टक्के चाचण्या झाल्या आहेत.
एक दिवसाआड 'व्हीसी'
कोरोना चाचण्यांसह इतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती हे एक दिवसाआड जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांची 'व्हीसी' (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) घेतात. अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या या समन्वयांमुळे कोरोना चाचण्यांमध्ये वाढ होण्यास मोठी मदत झाली आहे.
गावागावांमध्ये शिबिराच्या माध्यमातूनही कोरोना तपासण्या करण्यात येत आहेत. सर्वांच्या समन्वयामुळे कोरोना टेस्ट वाढल्या आहेत. आरोग्य विभागाच्या प्रत्येक केंद्रांवरही तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनी तसेच कुठलेही लक्ष आढळून आल्यास तातडीने कोरोना टेस्ट करून घ्यावी.
डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.
जिल्हानिहाय झालेल्या तपासण्या
बुलडाणा १४०२३१
यवतमाळ १३५१९९
अमरावती ११८३४६
अकोला १०५४७९
वाशिम ७७१६५
जिल्ह्यात याठिकाणी होतात कोरोना चाचण्या
५२ प्राथमिक आरोग्य केंद्र
१६ ग्रामीण रुग्णालय
२४ कोविड सेंटर