जिल्ह्याचा मृत्युदर नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:58+5:302021-05-21T04:35:58+5:30
बुलडाणा : संसर्गजन्य असलेल्या कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या १४ महिन्यांत ५३६ जणांचा मृत्यू झाला असला तरी जिल्ह्याचा मृत्युदर गेल्या तीन ...
बुलडाणा : संसर्गजन्य असलेल्या कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या १४ महिन्यांत ५३६ जणांचा मृत्यू झाला असला तरी जिल्ह्याचा मृत्युदर गेल्या तीन वर्षांपासून ४.८८ टक्के ते ४.८७ टक्क्यांच्या दरम्यान स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव होण्याअगोदर संसर्गजन्य आजाराचे प्रमाण हे १९९० च्या तुलनेत जिल्ह्यात घटून असंसर्गजन्य आजारात मोडणाऱ्या हार्ट अटॅक, फुप्फुसाशी संबंधित आजार आणि रक्तदाबाशी संबंधित आजार पहिल्या तीन क्रमांकावर आले होते.
त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य धाेरणांतर्गत २०२५ पर्यंत या असंसर्गजन्य आजारांमुळे अकाली होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे एकचतुर्थांशाने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. २०१९ मध्ये क्षयरोग, कृष्ठरोग व असांसर्गिक रोग नियंत्रण अभियानांतर्गत जिल्ह्यात सर्वेक्षणही करण्यात आले होते. मधुमेह, कर्करोग आणि हृदयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी कार्यक्रमही सुरू करण्यात आला होता. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाचाही या कार्यक्रमावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. सध्या संपूर्ण आरोग्य यंत्रणा ही कोरोनाच्या आलेल्या आपत्तीच्या नियंत्रणासाठी कार्यरत आहे. त्यातच कोरोनाबाधित रुग्णांचाही जिल्ह्यात मोठ्या संख्येने मृत्यू होत असल्याची जनसामान्यांमध्ये चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा एकंदरीत मृत्युदर नेमका किती याची माहिती घेतली असता बुलडाणा जिल्ह्याचा मृत्युदर गेल्या तीन वर्षांपासून ४.८८ ते ४.८७ टक्क्यांच्या आसपास नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे हा मृत्युदर नियंत्रणात असतानाच जिल्ह्याचा जन्मदर ही मागील वर्षाच्या तुलनेत दीड टक्क्यांनी घटला असल्याचे निदर्शनास आले आहे. एकंदरीत प्रशासनाकडील नोंदी पाहता या आकडेवारीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. दरम्यान, जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्युदर हा अवघा ०.६७ टक्के असल्याचेही जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे यांनी सांगितले.
--गेल्या वर्षात १४ हजार मृत्यू--
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसह अन्य कारणांमुळे जिल्ह्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये १४ हजार २५९ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९-२० या वर्षामध्ये जिल्ह्यातील १४ हजार ६७ व्यक्तींचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला होता तर २०१८-१९ मध्ये १३ हजार ९३१ जणांचा मृत्यू झाला होता. तीनही वर्षांचा विचार करता जिल्ह्याचा मृत्युदर हा ४.८८ ते ४.८७ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे निदर्शनास येत आहे.
--आरोग्य यंत्रणेची दुहेरी कसरत--
कोरोनासोबतच असांसर्गिक आजाराचेही प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेला काम करावे लागत आहे. कोरोनाच्या आपत्तीमुळे असंसर्गजन्य आजारासंदर्भात राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाकडे आरोग्य यंत्रणेला लक्ष द्यावे लागत आहे.
--असंसर्गजन्य आजारामुळे मृत्यूचे प्रमाण वाढलेले--
असंसर्गजन्य आजारामुळेही जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढलेले असून एका अंदाजानुसार ६० टक्के मृत्यू या आजारामुळे होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यात ११ लाख १८ हजार २३१ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येऊन २ लाख १८ हजार नागरिकांची प्रत्यक्ष तपासणी केली असता त्यात ६ हजार ३१९ व्यक्तींना हायपरटेन्शन, मधुमेह होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. दुसरीकडे २०१६ च्या सर्वेक्षणानुसार ११ टक्के व्यक्तींना हार्टअटॅक येण्याचा धोका निर्माण झालेला असल्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.