जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडून वरिष्ठांची दिशाभूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:43 AM2017-08-26T00:43:27+5:302017-08-26T00:44:10+5:30
जिल्हा पुरवठा विभागातील अनागोंदी कारभारामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था धोक्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. धान्य वाहतुकीच्या करारनाम्याची पुरवठा अधिकार्यांकडून ऐशीतैशी करण्यात आल्याने, मोठय़ा प्रमाणात रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात गेल्याची शक्यता वर्तविली जात असून, संशयाची सुई जिल्हा पुरवठाअधिकार्यांभोवती फिरत असल्याची चर्चा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हा पुरवठा विभागातील अनागोंदी कारभारामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था धोक्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. धान्य वाहतुकीच्या करारनाम्याची पुरवठा अधिकार्यांकडून ऐशीतैशी करण्यात आल्याने, मोठय़ा प्रमाणात रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात गेल्याची शक्यता वर्तविली जात असून, संशयाची सुई जिल्हा पुरवठाअधिकार्यांभोवती फिरत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, रेशनच्या धान्याच्या मालाची वाहतूक करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने, अमरावती येथील वाहतूक कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली सुरू असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
रेशनच्या मालाची वाहतूक करण्यासाठी कंत्राटदाराशी करण्यात आलेल्या करारनाम्यातील तिसर्या क्रमांकाच्या अटी व शर्तीनुसार, धान्य वाहतूक करणार्या वाहनांना स्वखर्चाने हिरवा रंग देणे, तसेच या वाहनांवर ‘सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारित धान्य वितरण पद्धत महाराष्ट्र शासन’ असे स्पष्ट लिहून सदर वाहनांना जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडून लेखी मान्यता घेऊनच सदर वाहनाचा वाहतुकीसाठी उपयोग करणे बंधनकारक आहे. त्याच प्रमाणे १४ व्या क्रमाकांच्या अटी व शर्तीनुसार, धान्याची अफरा तफर आणि काळाबाजार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. यामध्ये कंत्राटदाराने सादर केलेली मालकीच्या व नियंत्रणाखालील वाहनांच्या यादी व्यतिरिक्त वाहतूकदाराने वाह तुकीकरिता अतिरिक्त वाहने उपलब्ध करून दिल्यास अशा वाहनांच्या नोंदणी क्रमांकासह यादीस जिल्हाधिकारी लेखी मान्यता देतील, अशा वाहनाव्यतिरिक्त अन्य वाहनांमध्ये धान्य भरून देण्यात येणार नाही, मान्यताप्राप्त वाहनाव्यतिरिक्त इतर वाहनातून वाहतूक केल्यास सदरची धान्य वाहतूक काळ्याबाजारात नेण्यासाठी करण्यात येत असल्याचे मानून वाहतूक कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, असा करार आहे; मात्र चिखली, धाड आणि खामगाव या तीनही घटनांमध्ये गाडीला हिरवा रंग आणि लिहिलेले आढळून आले नाही. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत, श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीला रेशनच्या मालाची वाहतूक करण्यासाठी स्वत: मान्यता दिल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.
मालाच्या वाहतुकीचे आदेश देण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना असताना, जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कंत्राटदाराशी संगनमत करीत असल्याची चर्चा असून, या माध्यमातून दिशाभूल करीत, जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी कोट्यवधी रुपयांच्या धान्यांच्या अफरातफरीस प्रोत्साहन दिल्याचे दिसून येते.
या वाहनांतून नियमबाह्य वाहतूक!
२२ जून २0१७ रोजी चिखली येथे एम एच १९-२0९७ या ट्रकमधून ३५0 कट्टे, २0 जुलै २0१७ रोजी धाड येथे एम एच 0२- एक्सए - ६५४१ या वाहनातून १0२ कट्टे त्याचप्रमाणे २0 ऑगस्ट २0१७ रोजी खामगाव येथे एम.एच. २८ एबी ७९६९ या वाहनातून सुमारे ४00 कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला. उपरोक्त तीनही वाहनांतून नियमबाह्य वाहतूक झाल्याचे समोर आले आहे.
श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनी काळ्या यादीत!
जिल्ह्यात दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल सात घटना उघडकीस आल्या. दरम्यान, खामगाव येथे ट्रक पकडण्यात आल्यानंतर ट्रकमधील माल शासनजमा करण्यात आला. या ट्रकमध्ये शासकीय बारदाना निघाल्याने, या प्रकरणाचे बिंग फुटल्यानंतर अमरावती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी संबंधित कं पनीला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. त्यामुळे या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे संकेत मिळत आहेत.