राज्यामध्ये जिल्ह्याची मका खरेदी अव्वल..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:29 AM2020-12-24T04:29:47+5:302020-12-24T04:29:47+5:30
बुलडाणा : जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमीभावाने मका, ज्वारी, बाजरी खरेदी सुरू आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमीभावाने मका, ज्वारी, बाजरी खरेदी सुरू आहे. आतापर्यंत मका खरेदीसाठी ११ हजार ३३१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ४ हजार ५७७ शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार ७८८ शेतकऱ्यांनी १ लाख ४० हजार ९२५ क्विंटल मका खेरदी करण्यात आलेला आहे. खरेदीची रक्कम रुपये २६.७ कोटी असून, त्यापैकी १५ कोटी रक्कम ही ऑनलाइन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. राज्यात मका खरेदीबाबत जिल्ह्याने राज्यामध्ये अव्वल क्रमांक पटकाविला आहे. आतापर्यंत सर्वात जास्त मका खरेदी जिल्ह्याची झाली आहे.
तसेच जिल्ह्यामध्ये ज्वारी खरेदीसाठी २ हजार ७३७ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी १ हजार ६४७ शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी एसएमएस पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १ हजार २८२ शेतकऱ्यांची १७ हजार १२२ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. खरेदीची रक्कम रुपये ४.४८ कोटी असून त्यापैकी २ कोटी रक्कम ही ऑनलाइन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या सहकार्यामुळे राज्यामध्ये जिल्ह्याची अव्वल स्थानावर खरेदी होऊ शकली आहे. शासनाने मका खरेदीची मुदत ३१ डिसेंबर २०२० दिलेली असली तरी राज्यातील मार्केटिंग फेडरेशनला केंद्र शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे पोर्टल बंद झाले असल्याने शासनाने पुढील आदेशापर्यंत मका खरेदी बंद राहणार आहे. पुढील आदेश प्राप्त होताच मका खरेदी सुरू करण्यात येईल. मात्र ज्वारीच्या खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने ज्वारीची खरेदी ३१ डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे, असे जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे कळविले आहे.