बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यांग समाधानने कळसूबाई शिखरावर फडकविला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 11:40 AM2021-02-03T11:40:19+5:302021-02-03T11:40:28+5:30
Kalsubai Peak दिव्यांग असलेल्या समाधान बंगाळे या २४ वर्षीय युवकाने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील दिव्यांग असलेल्या एका २४ वर्षीय युवकाने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर केले. आपल्या अंगी असलेल्या जिद्दीने त्याने शिखरावर समाधानाचा तिरंगा फडकविला आहे. राज्यातील १९ युवकांनी शिखर सर करण्यासाठी प्रयत्न केले. यात बुलडाणा जिल्ह्यातील समाधान बंगाळे या युवकाचा समावेश होता.
बुलडाणा जिल्ह्यातील शिंदी येथील समाधान बंगाळे हा एका पायाने दिव्यांग आहे. शिव ऊर्जा प्रतिष्ठान औरंगाबाद संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी संस्थेच्या वतीने दिव्यांगासाठी ही मोहीम आयोजित केली होती. गाडे हे स्वतः दिव्यांग असून दिव्यांगांच्या कल्याणासाठी झटत आहेत. दिव्यांग कल्याण संघटनेत समाधान बंगाळे हा काम करीत असल्याने आपणही कळसूबाई शिखर पार करू शकतो, अशी जिद्द मनाशी बाळगून त्याने शिवाजी गाडे यांच्याशी संपर्क साधला. या मोहिमेत जिल्ह्यातून एकमेव समाधान बंगाळे हा दिव्यांग तरुण सहभागी झाला. २६ जानेवारीला संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण सुरू असताना इकडे महाराष्ट्रातील १९ अपंग हातात तिरंगा घेऊन गड सर करीत होते. याबद्दल समाधान बंगाळे याला प्रशस्तिपत्र व गोल्ड मेडल देऊन संस्थेच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.