‘जिद्दी’ च्या अंगाने नियतीला लोळविणारा ‘दिव्यांग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 03:41 PM2019-02-23T15:41:17+5:302019-02-23T15:42:22+5:30
खामगाव: ‘इन्सान वो नही, जो हवाके साथ बदले; इन्सान तो वो है, जो हवाका भी रूख बदले!’ या प्रमाणे प्रतिकूल परिस्थितीशी ‘दोन हात’ करणारी दिव्यांग व्यक्ती खामगाव परिसरात हजारो तरूणांसाठी प्रेरणा ठरताना दिसत आहे.
- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ‘इन्सान वो नही, जो हवाके साथ बदले; इन्सान तो वो है, जो हवाका भी रूख बदले!’ या प्रमाणे प्रतिकूल परिस्थितीशी ‘दोन हात’ करणारी दिव्यांग व्यक्ती खामगाव परिसरात हजारो तरूणांसाठी प्रेरणा ठरताना दिसत आहे.
रेल्वे अपघातात दोन्ही हातांचे पंजे गमवावे लागल्यानंतरही जणू काही अंगावरील धूळ झटकल्यागत नियतीच्या विरोधात जिद्दीने उभी राहणारी ही व्यक्ती निराशेच्या गर्तेत अडकणाºयांसाठी ‘आयकॉन’ ठरू पाहत आहे. शिवणकामाचा ‘हुन्नर’ जपताना चक्क पायाच्या बोटात कैची पकडून कपडे कापणारा ‘टेलर’ सध्या सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय बनला आहे.
शत्रुघ्न शामराव देठे. परिस्थिीतीलाही हरविणारे हे नाव. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यातील डोलारखेड या छोट्याशा गावात ते टेलरिंग करून कुटूंबाचा उदर्निवाह करतात. सन १९९८ मध्ये शेगाव ते जलंब असा रेल्वे प्रवास करीत असताना अचानक भोवळ आली अन् ते बेशुध्द पडले. यानंतर शुध्द आली, ती दवाखान्यातच. परंतु तेव्हा सर्व काही संपल्यागत झाले होते. दोन्ही हातांचे पंजे कापल्या गेलेले होते. हे जेव्हा देठे यांना समजले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. शिवणकामाचे धडे घेण्याचा तो काळ होता. यातून पैसा कमवून आयुष्य सावरायचे होते. परंतु हाताला पंजेच नाहीत म्हटल्यावर हे अशक्यप्रायच होते. काही दिवसांनी दवाखान्यातून सुटी झाल्यावर ते घरी आले. परिस्थिती हलाखीची होती. निराशा घेरू पाहत होती. परंतु ते अचानक ते उठले आणि स्वत:च स्वत:ची प्रेरणा बनले. इथून सुरू झाला तो अबलख प्रवास. त्यांनी पायाच्या बोटात कैची पकडून कपडे कापण्याचा सराव केला. सुरूवातीला, हे जमेल असे वाटले नाही. परंतु जिद्द नावाच्या गोष्टीपुढे परिस्थिती हरली. आता गेल्या २१ वर्षांपासून त्यांच्या पायांची बोटे हातांच्या बोटांनाही खाली बघायला लावतात. अगदी सहजपणे ते पायाच्या बोटात कैची पकडून कपडे कापतात. डोलारखेड या गावात ते एकटेच टेलर आहेत, शिवाय आजुबाजूच्या खेड्यापाड्यातूनही त्यांच्याकडे कपडे शिवायला येतात. देठेंना अश्विनी, वैष्णवी, भक्ती आणि कृष्णाली ह्या चार मुली आहेत. या मुलींचे लग्न करायचे आहे. परंतु त्यांना त्यांच्या जिद्दीपुढे यात विशेष असे काहीच वाटत नाही. आजच्या धडधाकट तरूणांनी कुठल्याही परिस्थितीत निराश न होता, जिद्दीच्या बळावर यशोशिखर गाठावे, असा संदेश दिल्याशिवाय ते राहत नाहीत.
दिव्यांग व्यक्तीचा संसार सुखाचा करणारी माऊली!
शत्रुघ्द देठे यांचा अपघात झाला; तेव्हा त्यांचे लग्न झाले नव्हते. त्यामुळे दोन्ही हाताचे पंजे नसलेल्या माणसाचा संसार कसा असेल, याबाबत जरा शंकाच होती. परंतु ही कमी भरून काढली, ती ‘सिंधू’ तार्इंनी. सर्व कल्पना असतानाही त्यांनी शत्रुघ्न देठे यांच्याशी विवाह केला. प्रत्येक क्षणाला त्यांनी पतीला साथ दिली. त्या शेतमजूरी करून शत्रुघ्न देठे यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहील्या आहेत.