दिवाळी तोंडावर आली तरी चार शिधा जिन्नसांचा साठा पोहोचलाच नाही!
By अनिल गवई | Published: October 20, 2022 02:28 PM2022-10-20T14:28:36+5:302022-10-20T14:29:11+5:30
लाभार्थी संतप्त: स्वस्त धान्य दुकानदार आणि लाभार्थ्यांमधील वाद विकोपाला
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेल्या अन्न संचाच्या वितरणाची घोषणा राज्य शासनाने केली आहे. मात्र, दिवाळीपूर्वी या शिधाजिन्नसांचा पुरवठाच झाला नाही, परिणामी जिल्ह्यातील चार लक्ष ८८ हजार लाभार्थ्यांना दिवाळीच्या तोंडावरच संचाचे वितरण रखडल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.
‘राज्य सरकारनं दिवाळीनिमित्त गोरगरीबांना शिधा देण्याचा निर्णय घेतला. चार शिधा जिन्नस वितरीत करण्यासाठी साधारणपणे ५१३ कोटी रुपयांचा कंत्राट देण्यात आला. ठरावित कालावधीत टप्पे निहाय संबंधित वस्तू दिवाळी पूर्वी राज्यातील सर्वच गोदामात संच पोहोचणे आवश्यक होते. मात्र, विदर्भातील अनेक गोदामात अद्यापपर्यंत किट पोहोचलेच नाही. अर्धवट आणि अपुºया मालामुळे पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यासह अनेक ठिकाणी संचाचे वितरण रखडले आहे. त्यामुळे लाभार्थी आणि स्वस्त धान्य दुकानदारामध्ये खटके उडत आहेत. त्याचवेळी संच वितरणाला वेळेचे बंधन आल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना स्वत:च संच तयार करावा लागणार असल्याची आपातकालीन परिस्थिती बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली आहे. राज्य शासनाने जे पुरवठादार ठरवले आहेत, त्यांच्यावर आधीच आधीच गुन्हे दाखल आहेत, ते पूर्वी ब्लॅकलिस्टेड होते. तीन-चार दिवसांत हे पुरवठादार ठरवल्यानं इतर पुरवठादार येऊ शकले नाहीत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनही पुकारले होते. तथापि, गरीबांची दिवाळी ‘गोड’ करण्या ऐवजी पुरवठादाराचीच दिवाळी ‘गोड’ केली जाणार असल्याची जाणीवपूर्वक वेळ सरकारने आणली तर नाही ना? असा प्रश्न सामान्यांमध्ये उपस्थित होत आहे. शंभर क्विंटलची मागणी असताना ८० क्विंटल तोही अपुराचा साठा गोदाम पालांना प्राप्त झाला आहे.
काही ठिकाणी डाळ तर काही ठिकाणी मैदा नाही!
- जिल्ह्यातील १६ गोदामांवर कुठे चणा डाळ पोहोचली आहे. तर कुठे मैदाचा साठा उपलब्ध आहे. मात्र, त्याचवेळी कुठे तेल तर कुठे साखरेचा तुटवडा आहे. चारही शिधा जिन्नस आणि त्यांचा संच कुठेही उपलब्ध नसल्यामुळे दिवाळीपूर्वी संच वितरीत करायचे तरी कसे? असा पेच पुरवठा विभागाच्या समोर उभा राहीला आहे.
गोदाम निहाय आवश्यक संचाची मागणी
बुलडाणा ५०२४२
चिखली ४०१०९
अमडापूर १२९०५
देऊळगाव राजा २३९९७
सिंदखेड राजा २०५५३
साखरखेर्डा १४०७६
मेहकर ३४५४२
डोणगाव ११६९२
लोणार ३१९१८
खामगाव ४६६९१
शेगाव २८२१२
मलकापूर ३४२३२
मोताळा ३३५१२
नांदुरा ३९१५५
जळगाव जामोद ३२७२७
संग्रामपूर ३३४४५
एकुण ४८८००८
योजनानिहाय लाभार्थी
अंत्योदय अन्न योजना ६२५६७
प्राधान्य गट लाभार्थी ३४०८२३
शेतकरी लाभार्थी ८४६१८