ज्ञानगंगा अभयारण्यातील पाणवठे कोरडे; वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 03:46 PM2018-04-04T15:46:53+5:302018-04-04T15:46:53+5:30
बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलडाणा रेंजमधील कृत्रीम पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलडाणा रेंजमधील कृत्रीम पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. चार तालुक्यात विस्तार असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याची बुलडाणा व खामगाव अशी विभागणी करण्यात आली आहे. बुलडाणा रेंजमध्ये ४ राऊंड व ९ बीट आहेत. तर खामगाव रेंजमध्ये ३ राऊंड व ११ बीट आहेत. क्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठे असलेल्या या अभयारण्यात विविध प्रजातीचे प्राणी, पक्षी अधिवास करतात. मात्र सध्या जंगलातील पाणी संपत आल्याने वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. बहुतांश पाणवठे कोरडे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. काही पाणवठ्यांमधील पाणी कमी झाल्याने प्राण्यांना पाणी पिणे शक्य होत नाही. वास्तविक जानेवारीपासूनच जंगलातील पाण्याचे स्त्रोत कमी होण्यास सुरुवात झाली होती. संबंधित विभागाने तेव्हापासूनच पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्याची गरज होती. मात्र बुलडाणा रेंजमध्ये या बाबीकडे दुलर्क्ष झाल्याचे बघायला मिळते. वेळीच उपाययोजना करुन मुक्या जीवांची तहान भागवण्याची आवश्यकता आहे.
जुने पाणवठे नादुुरुस्त
वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी बुलडाणा रेंजमध्ये २८ कृत्रीम पाणवठे निर्माण करण्यात आलेले आहेत. तर यावर्षी ८ नवीन पाणवठे बनविण्याचे वन्यजीव विभागाचे नियोजन आहे. जुन्या पाणवठ्यांपैकी अनेक पाणवठे नादुरुस्त आहेत. त्यामधील प्लास्टिक फाटलेले असून तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तेव्हाच या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकता येईल.
या प्राण्यांचा आहे अधिवास
ज्ञानगंगा अभयारण्यात विविध प्रजातींच्या प्राण्यांचा अधिवास आहे. बिबट, अस्वल, रानडुक्कर, तडस, कोल्हा, लांडगा, निलगाय, हरण, मोर, ससे, अजगर यासह विविध प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. प्राण्यांची मोठी संख्या पाहता अभयारण्यात त्यांच्यासाठी पाण्याची सोय करणे आवश्यक आहे.
कृत्रीम पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यासाठी आजपासून चार टँकर्स सुरु करण्यात आली आहेत. वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होवू नये याची खबरदारी घेण्यात येईल.
- मयूर सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव