अनुदान घेऊन शौचालय न बांधणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!
By admin | Published: May 22, 2017 12:35 AM2017-05-22T00:35:46+5:302017-05-22T00:35:46+5:30
नगरपालिकेची पोलीस ठाण्यात तक्रार : आणखी नागरिकांची नावे करणार जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ६ हजार रुपये प्रथम हप्ता अनुदानाचा लाभ घेऊनही अद्याप शौचालयाच्या बांधकामास सुरुवात केलेली नाही. अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करा, अशी तक्रार नगरपालिकेने पोलीस स्टेशनमध्ये रविवारी दिली.
अनुदान घेऊनही शौचालय न बांधणारे नागरिक उघड्यावर शौचास जात असल्यामुळे हगणदरीमुक्त शहराचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही आहे. अनुदान घेऊनही शौचालय न बांधणारे भिलवाडामधील उषा भिवा माळी, देवका प्रभाकर बोदडे, लताबाई गोमा ठाकरे, इंदिरानगरमधील विमल अशोक कोरडे, शे.सलीम शे.लाल, रिजवान खान गफ्फार खान, करुणा कैलास जाधव, इकबाल नगरमधील रईसा बानो मो.बक्ष, शे.रऊफ शे.युसूफ, हनीफ शाह दरबार शाह, अण्णाभाऊ साठे नगरमधील लता खंडू दांडगे, गजानन शंकर जाधव, राखी किशोर ससाणे, तेलगुनगरमधील महादेव मनमथ मिटकरी, सुनील वामन जवंजाळ, सारंगधर सदानंद कुंदेटकर, शकुंतला शामप्रसाद शर्मा यांनी शौचालय बांधले नसल्यामुळे यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करण्यात आली आहे. इतर पात्र लाभार्थींनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा पोलीस कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
अनेक नागरिकांनी शौचालय बांधण्याकरिता अनुदान घेतले आहे. मात्र, त्यानंतरही शौचालय बांधले नाहीत. त्यामुळे हगणदरीमुक्त मोहीम राबविण्यात अडचणी येत आहेत. ज्यांनी अनुदान घेतल्यावरही शौचालय बांधले नाही, अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
- करणकुमार चव्हाण
मुख्याधिकारी, बुलडाणा