गॅसजोडणी असल्यास शिधापत्रिका रद्द करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:28 AM2021-05-03T04:28:54+5:302021-05-03T04:28:54+5:30
रोहयोच्या मजुरीत दहा रुपयांची वाढ बुलडाणा : रोहयो योजनेत काम करणाऱ्या मजुरांना पूर्वी २३८ रुपये रोजगार दिला जायचा. आता ...
रोहयोच्या मजुरीत दहा रुपयांची वाढ
बुलडाणा : रोहयो योजनेत काम करणाऱ्या मजुरांना पूर्वी २३८ रुपये रोजगार दिला जायचा. आता यामध्ये आणखी दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे रोहयो मजुरांना २४८ रुपये रोजगार मिळणार आहे.
अंजनी येथे तीव्र पाणीटंचाई
मेहकर : तालुक्यातील अंजनी येथे गत काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील पाणीटंचाईकडे गावपुढारी आणि सचिव दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून येथील पाणीटंचाई निर्मूलनासाठी प्रयत्न व्हावेत.
हॉटेलबंदीने हिरावला महिलांचा रोजगार
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व हॉटेल महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील हॉटेलमध्ये पोळी, भाकरी करण्यासाठी काम करत असलेल्या महिलांचा रोजगार हिरावला गेला आहे.
३० गुंठ्यांत २० क्विंटल हळदीचे उत्पादन
साखरखेर्डा : येथील एका शेतकऱ्याने ३० गुंठ्यांत २० क्विंटल हळद आणि सहा क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत केली तर शेती कशी परवडते, याचे उत्तम उदाहरण शेतकरी गजानन मंडळकर यांनी दाखवून दिले आहे.
कोरोनामुळे आठवडी बाजार बंद
धामणगाव बढे : दिवसेंदिवस जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले आहेत तसेच नियम अधिक कडक केले आहेत. आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांपुढे भाजीपाला विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण संकटात सापडले आहे.
महागाई कमी करण्याची मागणी
सुलतानपूर : मागील काही दिवसांपासून बहुतेक सर्वच वस्तूंची दरवाढ झाली असल्याने महागाईचा भडका उडाला असून, सर्वसामान्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र शासनाने महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
विमा रक्कम खात्यावर जमा करा
बुलडाणा : कोरोना आपत्तीमुळे शासनाने पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी सुदेश गुलभेले यांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सुरक्षित अंतर ठेवून वस्तूंची विक्री करा
किनगावराजा : किराणा दुकानदारांनी सुरक्षित अंतराची व्यवस्था करून वस्तूची विक्री करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांसाठी हॅण्डवॉशची सुविधा उपलब्ध करून द्यावी, याबाबत जनजागृती मोताळा येथे करण्यात आली आहे.
वृक्षसंवर्धनाकडे होतेय दुर्लक्ष !
देऊळगाव मही : सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रस्ते दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली आहे. मात्र या वृक्षरोपट्याच्या संवर्धनाकडे लक्ष पुरविण्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
शेतकत्यांच्या समस्या सोडवा!
सुलतानपूर : शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन पेरणीपूर्वी समस्या सोडवाव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. खत कारखान्यांना दिली जाणारी सबसिडी शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आहे.
कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय
बुलडाणा : गेल्या एक वर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट घोंगावत आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम आदी सेवाभावी संस्थादेखील यामुळे अडचणीत आल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे दातृत्वाचा झराही आटल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे.
मेहकर तालुक्यात दहा विहिरींचे अधिग्रहण
मेहकर : मागील वर्षी मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. यामुळे तालुक्यातील पेनटाकळी कोराडी प्रकल्पासह इतर लघु जलाशय तुडुंब भरले होते. मात्र तरीही मेहकर तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट कायम असून, पाणीटंचाईकरिता आजपर्यंत दहा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
धाड परिसरात रोहित्र नादुरुस्त
धाड : परिसरात विद्युत रोहित्र नादुरुस्त असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रोहित्र खुले असून, यामुळे जीविताला धोका निर्माण झाला आहे. याकडे महावितरणने लक्ष द्यावे.
बँकांसमोरील गर्दी नियंत्रणात येईना !
बुलडाणा : विविध योजनांचे पैसे काढण्यासाठी सामान्य नागरिकांची बँकांमध्ये एकच गर्दी होत आहे. प्रत्येक नागरिकाला पैसे मिळावे यासाठी बँकांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिक समजून घेत नसल्याने बँकांसमोरील गर्दी वाढतच आहे.