मुलीचा नैसर्गिक हक्क हिरावून घेऊ नका!
By admin | Published: January 25, 2016 02:22 AM2016-01-25T02:22:28+5:302016-01-25T02:22:28+5:30
राष्ट्रीय बालिका दिनी ‘संकल्प लेकीचा’ अभियानाला सुरुवात.
बुलडाणा : माणूस म्हणून जन्माला येण्याचा अधिकार प्रत्येक मुलीला असून, गर्भलिंग निदानानंतर गर्भपात करून तिचा तो नैसर्गिक हक्क हिरावून घेऊ नका, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते वर्षाताई देशपांडे यांनी केले. स्त्री जन्मदर कमी असण्याच्या लांच्छनास्पद बाबीमध्ये महाराष्ट्रात बुलडाणा जिल्ह्याचा चौथा क्रमांक असून, आता या जिल्ह्यात प्रबोधनापेक्षा स्टिंग ऑपरेशन करून भंडाफोड करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित करुन दरवर्षी सोनोग्राफीच्या माध्यमातून महाराष्ट्रात ६ लाख मुली गर्भातूनच गायब केल्या जातात, अशी खळबळजनक माहितीही यावेळी दिली. बुलडाणा जिल्हा परिषद तथा लेक माझी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बालिका दिनाच्या पर्वावर रविवार, २४ जानेवारी रोजी स्थानिक जिजामाता प्रेक्षागारावर संकल्प लेकीचा या जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून वर्षाताई देशपांडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा अलकाताई खंडारे होत्या. जिल्हाधिकारी विजय झाडे यांनीही बुलडाणा जिल्ह्यातील घटत्या स्त्री जन्मदरावर चिंता व्यक्त करुन यासाठी प्रशासकीय पातळीवर कठोर पावले उचलण्याची हमी दिली. प्रारंभी आढावा डॉ. अर्चना वानेरे यांनी घेऊन या प्रबोधनात्मक चळवळीच्या माध्यमातून झालेल्या सकारात्मक कार्याची माहिती दिली. प्रास्ताविकातून दीपा मुधोळ यांनी हे अभियान जरी प्रशासनाच्या माध्यमातून राबविले जात असले तरी त्यात जनतेचा सहभाग महत्त्वाचे असल्याचे नमूद करत ही लोकचळवळ झाली पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली. १0 ऑक्टोबर रोजी जागतिक कन्या दिनाच्या दिवशी जिल्हाभर प्रबोधनात्मक फेर्या निघाल्या, तर २४ जानेवारी या राष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी हा उद्बोधनात्मक कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगून, ही फक्त सुरुवात आहे, आता हा उपक्रम वर्षभर चालणार आहे.