डीपी दुरुस्त न करणे भोवले : कार्यकारी अभियंत्याकडून साडेसहा लाखांची वसुली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:57 AM2017-12-04T00:57:28+5:302017-12-04T01:02:37+5:30
सुनगावातील तीन शेतकर्यांनी नागपूर येथील वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. त्याचा निकाल हाती आला असून, वीज मंडळाच्या मलकापूर येथील कार्यकारी अभियंत्याला साडेसहा लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागली. एक वर्षाच्या संघर्षानंतर हा न्याय मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : तालुक्यातील सुनगाव येथील वावडी हरदो येथील रोहित्र डी पी नादुरुस्त झाल्यानंतर तब्बल साडेचार महिने वीज मंडळाने दुरुस्त न केल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. सुनगावातील तीन शेतकर्यांनी नागपूर येथील वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. त्याचा निकाल हाती आला असून, वीज मंडळाच्या मलकापूर येथील कार्यकारी अभियंत्याला साडेसहा लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागली. एक वर्षाच्या संघर्षानंतर हा न्याय मिळाला.
वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी तथा कामकाजातील अनियमितता नेहमीच होत असल्याची ओरड असते; परंतु याविरुद्ध कोणीही ग्राहक मंचाकडे दाद मागत नाही. त्यासंदर्भातील नियमसुद्धा ग्राहकांना माहिती नसतात; परंतु सुनगाव येथील अरुण गणपतराव धुळे, महादेव सखाराम बार पाटील व आशा महादेव बारपाटील या तीन शेतकर्यांनी रोहित्र बंद पडल्याने शेतीच्या पिकांचे जे नुकसान झाले, त्याबाबतची तक्रार नागपूर येथील वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे केली. वीज वितरण कंपनीचे अधिकारी ए. जी. काठोळे आणि या तीन शेतकर्यांची बाजू समजून घेतल्यानंतर या मंचच्या न्यायाधीश चित्रकला झुत्शी यांनी शेतकर्यांच्या बाजूने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यात वीज मंडळाच्या निष्काळजीपणामुळे रोहित्र जितके दिवस बंद होते, त्या १३४ दिवसांना प्रतितास ५0 रु.प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच अन्य खर्चाची रक्कमसुद्धा त्यामध्ये समावेश करीत शेतकर्यांना मानसिक त्रास झाल्याबद्दल २000 रु.ची नुकसान भरपाईसुद्धा देण्याच्या निकालात स्पष्ट केले. त्यामुळे मलकापूर येथील कार्यकारी अभियंता यांना च क्क सहा लाख बावन हजार पाचशे रुपयांचे चार चेक शेतकर्यांना द्यावे लागले. ही रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा झाली असून, या रकमेचे वसुली वीज वितरण कंपनी दिरंगाई करणार्या अभियंत्याच्या पगरातून वसूल करणार असल्याचे समजते. रोहित्र बंद असण्याचा कालावधी १५ जुलै २0१६ ते २६ नोव्हेंबर २0१६ असा होता. न्यायासाठी शेतकर्यांना बुलडाणा, अकोला व नागपूर येथील ग्राहक मंचात एक वर्ष संघर्ष करावा लागला. ग्राहक मंचातील तक्रार मागे घ्यावी, यासाठी त्यांच्यावर वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी काही खोटे चोरीचे आरोपसुद्धा केले होते. या रोहित्रांतर्गत सुमारे ३0 शे तकर्यांनी वीज कनेक्शन घेतले आहे; परंतु इतर शेतकर्यांनी तक्रार केली नव्हती.
त्यामुळे उर्वरित शेतकर्यांना या प्रकरणाच्या अनुषंगाने लाभ मिळू शकला नाही; परंतु आता शेतकरीही सतर्क होत आहेत.
तर मिळाले असते कोट्यवधी
सर्व शेतकर्यांनी जर तक्रार केली असती, तर वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना कोटीच्या घरात नुकसान भरपाई द्यावी लागली असती. याबाबत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद खंडागळे व तालुका अध्यक्ष दीपक ताडे यांचे विशेष सहकार्य या शेतकर्यांना मिळाले.
वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या दिरंगाईमुळे जर आपल्या शेतमालाचे नुकसान होत असेल, तर शेतकर्यांनी व अन्य वीज ग्राहकांनी तक्रार करून पुराव्यासह व्यवस्थित मुद्दे रेटले तर निश्चित न्याय मिळतो. आम्हाला मिळालेल्या न्यायाचे श्रेय निर्णय देणार्या चित्रकला झुत्शी यांना आहे.
-अरुण गणपतराव धुळे, तक्रारकर्ते सुनगाव.