कमी दराने माल विकू नका - पणन मंत्री सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:30 AM2018-02-03T01:30:08+5:302018-02-03T01:32:13+5:30
राज्य शासनाने शासकीय हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गतवर्षी तूर, या वर्षी सोयाबीन, मूग, उडीद आणि आता या हंगामापासून पुन्हा तूर खरेदी करण्यात येणार आहे. शेतकर्यांनी कमी दराने शेतमालाची विक्री करू नये, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शेतकर्यांना चांगला भाव देऊन त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हमी भावापेक्षा कमी दराने खासगी व्यापारी शेतमाल खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राज्य शासनाने शासकीय हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गतवर्षी तूर, या वर्षी सोयाबीन, मूग, उडीद आणि आता या हंगामापासून पुन्हा तूर खरेदी करण्यात येणार आहे. शेतकर्यांनी कमी दराने शेतमालाची विक्री करू नये, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी केले.
शेगाव बाजार समितीमध्ये शासकीय तूर खरेदी केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, आमदार आकाश फुंडकर, सभापती गोविंद मिरगे, माजी आमदार धृपतराव सावळे, नगराध्यक्ष श्रीमती शकुंतला बूच, सहनिबंधक आर. जे. डाबेराव, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक खरात उपस्थित होते.
शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करीत सहकार मंत्री देशमुख म्हणाले की, शेतमाल तारण योजनेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकर्यांना सहभागी करून घ्यावे. या योजनेनुसार तारण शेतमालावर वार्षिक सहा टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध आहे. पणन मंडळामार्फत बाजार समित्यांना या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ते म्हणाले की, शासनाने खरेदी केलेल्या तुरीवर प्रक्रिया करून डाळ बनविण्यात येत आहे. ही डाळ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध झालेली आहे. शासनाने ऐतिहासिक कर्जमाफी दिली. पात्र वंचित शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी बँकेची आणि ऑनलाइन अर्जातील माहितीमध्ये त्रुटी असलेले अर्ज पुन्हा बँकांना पाठविण्यात आलेले आहे. एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित न राहू देण्याचा यामागील उद्देश आहे. शेतकर्यांचा शेतमाल खरेदी व्यवहार पारदर्शक करण्यासाठी ई- नाम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतमालाची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे, तसेच शेतमाल खरेदी केल्यानंतर खरेदीची रक्कम शेतकर्याच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे.