ओलावा नसल्यास तणनाशक फवारू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:16+5:302021-06-29T04:23:16+5:30

मेहकर: तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून जवळपास ७० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केल्या जाते. त्यामुळे सोयाबीन ...

Do not spray herbicides if there is no moisture | ओलावा नसल्यास तणनाशक फवारू नये

ओलावा नसल्यास तणनाशक फवारू नये

Next

मेहकर: तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून जवळपास ७० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केल्या जाते. त्यामुळे सोयाबीन पिकात तणनाशक मोठ्या प्रमाणात फवारण्यात येते. जमिनीत ओलावा नसल्यास तणनाशक फवारणी करणे घातक ठरू शकते. याकरिता तणनाशक खरेदी व फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़

पाऊस वेळेवर झाल्यामुळे पेरणी वेळेवर झालेली आहे. पेरणी करून जवळपास १० ते २० दिवस आटोपलेले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तण नियंत्रणाची घाई होते. काही शेतकऱ्यांनी तर तणनाशक फवारणीस सुरुवातसुद्धा केलेली आहे. तणनाशक खरेदी करतांना काळजी घ्यावी. अनोळखी किंवा रस्त्यावर विनापरवाना तणनाशकाची खरेदी करू नये. तणनाशक खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. पूर्ण हंगामाकरिता आवश्यक तेवढेच तणनाशक खरेदी करावे. खरेदीपूर्वी तणनाशकाचे पकिंगवरील लेबल पहावे व मुदतबाह्य तणनाशक खरेदी करू नये. व्यवस्थित पॅकिंग असलेले तणनाशक खरेदी करावे. तणनाशक फवारताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. जमिनीत ओलावा असल्यानंतरच तणनाशकाची फवारणी करावी. पीकनिहाय शिफारस केलेल्या व आव्यक्षक तीव्रतेच्याच तणनाशकाचीच फवारणी करावी. फवारणी करताना गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणी वापरावे. तणनाशकाचे द्रावण करताना हाताने ढवळू नये व कीटकनाशकाचे मिश्रण करू नये व शक्य असेल तेवढेच द्रावण करावे शिल्लक द्रावण तयार करून ठेऊ नये, फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हात मौजे, नाकावरील मास्क आदीचा वापर करावा. उघडया अंगाने फवारणी करण्याचे टाळावे. शक्यतो हवा कमी असताना योग्य नोझलचा वापर करून फवारणी करावी. फवारणी करताना इतर शिफारस नसलेल्या शेजारीच पेरणी केलेल्या पिकावर फवारा जाणार नाही याची काळजी घ्यावी. फवारणी करताना शरीराला अपायकारक ठरतील अशी कामे उदा. खाणे पिणे, धूम्रपान करणे, तंबाखू खाणे आदी कामे फवारणीच्या कालावधीत करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़

काेट

पूर्वी तणनाशक फवारणी करतांना शेतकरी नॅपसॅक स्प्रेअर किंवा पॉवर स्प्रेअरचा वापर करत असत. त्यामुळे आपण कोणते तणनाशक फवारणी केले याची माहिती असे. परंतु आता ट्रॅक्टरचलित स्प्रेअरचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ट्रॅक्टरमालक एकच स्प्रेअर उगवणपूर्व तणनाशक फवारणीसाठी व उगवणनंतर वापरावयाचे तणनाशक फवारणीसाठी वापर करत आहे. त्यामुळे पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्प्रेअरची टाकी फवारणी अगोदर स्वच्छ धुवून घ्यावी.

सुधाकर कंकाळ, मंडळ कृषी अधिकारी, मेहकर.(फोटो)

Web Title: Do not spray herbicides if there is no moisture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.