ओलावा नसल्यास तणनाशक फवारू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:46+5:302021-07-01T04:23:46+5:30

मेहकर : तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून, जवळपास ७० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते. त्यामुळे सोयाबीन ...

Do not spray herbicides if there is no moisture | ओलावा नसल्यास तणनाशक फवारू नये

ओलावा नसल्यास तणनाशक फवारू नये

Next

मेहकर : तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून, जवळपास ७० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते. त्यामुळे सोयाबीन पिकात तणनाशक मोठ्या प्रमाणात फवारण्यात येते. जमिनीत ओलावा नसल्यास तणनाशक फवारणी करणे घातक ठरू शकते. याकरिता तणनाशक खरेदी व फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़ पाऊस वेळेवर झाल्यामुळे पेरणी वेळेवर झालेली आहे. पेरणी करून जवळपास १० ते २० दिवस आटोपलेले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तण नियंत्रणाची घाई होते. काही शेतकऱ्यांनी तर तणनाशक फवारणीस सुरुवातसुद्धा केलेली आहे. तणनाशक खरेदी करताना काळजी घ्यावी. अनोळखी व्यक्ती किंवा रस्त्यावर विनापरवाना तणनाशकाची खरेदी करू नये. तणनाशक खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. पूर्ण हंगामाकरिता आवश्यक तेवढेच तणनाशक खरेदी करावे. खरेदीपूर्वी तणनाशकाचे पॅकिंगवरील लेबल पाहावे व मुदतबाह्य तणनाशक खरेदी करू नये. व्यवस्थित पॅकिंग असलेले तणनाशक खरेदी करावे. तणनाशक फवारताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. जमिनीत ओलावा असल्यानंतरच तणनाशकाची फवारणी करावी. पीकनिहाय शिफारस केलेल्या व आवश्यक तीव्रतेच्याच तणनाशकाची फवारणी करावी. फवारणी करताना गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणी वापरावे. तणनाशकाचे द्रावण करताना हाताने ढवळू नये व कीटकनाशकाचे मिश्रण करू नये. शक्य असेल तेवढेच द्रावण करावे. शिल्लक द्रावण तयार करून ठेवू नये. फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावर मास्क, आदींचा वापर करावा. उघड्या अंगाने फवारणी करण्याचे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़

काेट

पूर्वी तणनाशक फवारणी करताना शेतकरी नॅपसॅक स्प्रेअर किंवा पॉवर स्प्रेअरचा वापर करीत़; त्यामुळे आपण कोणते तणनाशक फवारणी केले याची माहिती असे; परंतु आता ट्रॅक्टरचलित स्प्रेअरचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ट्रॅक्टरमालक एकच स्प्रेअर उगवणपूर्व तणनाशक फवारणीसाठी व उगवणीनंतर वापरावयाचे तणनाशक फवारणीसाठी वापर करीत आहे. त्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्प्रेअरची टाकी फवारणीअगोदर स्वच्छ धुऊन घ्यावी. - सुधाकर कंकाळ, मंडल कृषी अधिकारी, मेहकर

Web Title: Do not spray herbicides if there is no moisture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.