आवाज कराल मोठा तर वापरू ‘नोटा’!
By Admin | Published: November 16, 2016 05:27 AM2016-11-16T05:27:20+5:302016-11-16T05:27:20+5:30
शहरात सध्या नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, जागोजागी प्रचाररथ फिरत आहेत. मात्र, प्रत्येक चौकात एकापाठोपाठ एक असे चार ते पाच प्रचाररथ येऊन थांबत असल्याने
सुधीर चेके-पाटील/ चिखली (बुलडाणा)
शहरात सध्या नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, जागोजागी प्रचाररथ फिरत आहेत. मात्र, प्रत्येक चौकात एकापाठोपाठ एक असे चार ते पाच प्रचाररथ येऊन थांबत असल्याने, या ध्वनिक्षेपकाद्वारे होणाऱ्या कर्णकर्कश गोंगाटामुळे शहरवासी पार वैतागले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी उमेदवारांचे हे प्रचारकार्य डोकेदुखी ठरत असल्याने, मतदारांकडून ‘नोटा’चा (चलनातून बाद झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा नव्हे, तर मतदार यंत्रावरील ‘नोटा’ ही पर्यायी सुविधा) वापर होण्याची दाट चर्चा मतदारांमध्ये ऐकावयास मिळत आहे.
चिखली नगरपालिका निवडणुकीचा मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण जोरदार तापू लागले आहे. या निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्वच उमेदवारांकडून प्रचारामध्ये आघाडी घेण्यासाठीची चढाओढ लागली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून प्रचार रथाद्वारे ध्वनिक्षेपकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.
शहरातील १३ प्रभागांतून २६ जागांसाठी, तसेच नगराध्यक्षपदासाठी असे एकूण ११६ उमेदवार नशीब अजमावत आहेत. येत्या २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.