हातणी ते धाड रस्त्याचे काम तातडीने करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:33 AM2021-02-13T04:33:58+5:302021-02-13T04:33:58+5:30
आमदार श्वेता महाले यांनी ११ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे ना.नितीन गडकरी यांची भेट घेत रस्त्याच्या कामाबाबत माहिती दिली. याची ...
आमदार श्वेता महाले यांनी ११ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे ना.नितीन गडकरी यांची भेट घेत रस्त्याच्या कामाबाबत माहिती दिली. याची दखल घेत ना.गडकरी यांनी प्रसिध्द सैलानी यात्रेपूर्वी रस्ता पूर्ण व्हावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आ.श्वेता महाले यांच्या समवेत बैठक घेऊन त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ७५३ एम हातणी ते रायपूर - सैलानी-दुधा- धाड- भोकरदन या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथपणे सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक तुरळक सुरु आहे. परंतू पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे या रस्त्यावरील गावांच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तथापि अद्यापही त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम रखडून पडल्याने कामाची किंमत वाढत चाललेली आहे. या रस्त्यावर सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान सैलानीबाबांचा दर्गा असून फेब्रुवारी-मार्च मध्ये तेथे मोठी यात्रा भरते. यात्रेत देशभरातून सुमारे २५ लाख भाविक येत असतात. रस्ता खराब असल्याने लाखो भाविकांना प्रचंड त्रास होणार आहे. यापृष्ठभूमीवर आ.महाले यांनी ना.गडकरी यांची भेट घेतली आहे. दरम्यान, यात्रा जवळ आली असल्याने यात्रेआधी हा रस्ता वाहतुकी योग्य बनविण्यासाठी युध्दस्तरावर काम करण्याचे संबंधितांना निर्देश देण्यात यावे. कंत्राटदाराने खोदून ठेवून काम अनेक महिने बंद ठेवल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुध्दा आ.महाले यांनी ना.गडकरी यांच्याकडे केली आहे.