प्रसव पीडेने त्रासलेल्या मांजरीचे सिझर करून डॉक्टरांनी केली सुटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:25 PM2018-08-26T13:25:19+5:302018-08-26T13:28:43+5:30

बुलडाण्यातील डॉक्टरांना कल्पना देण्यात आली आणि रात्री नऊच्या सुमारास थेट रुग्णालय गाठण्यात आले. डॉ. बी. आर. मोरे, डॉ. आर. बी. पाचरणे यांनीही हातातील सर्व कामे सोडून घाईगडबडीत रुग्णालय गाठले.

doctor cesarean pregnant cat buldhana | प्रसव पीडेने त्रासलेल्या मांजरीचे सिझर करून डॉक्टरांनी केली सुटका!

प्रसव पीडेने त्रासलेल्या मांजरीचे सिझर करून डॉक्टरांनी केली सुटका!

Next
ठळक मुद्दे तिला प्रसव पीडेचा मोठा त्रास होत असल्याचेही स्पष्ट झाले.डॉक्टरांनी अत्यंत संवेदनशीलते सोबतच नाजूकतेने हे सिझर केले. तिचा नुसता उल्लेख करीत होतो ती कुठली महिला नसून, ती एक पाळीव मांजर होती.


बुलडाणा: प्रसव पीडेने तिची शुक्रवारी रात्रीपासून घालमेल सुरू होती. घरातील जाणत्यांना तिचा हा नेमका त्रास काय, त्याची कल्पनाच नव्हती; मात्र तिचा त्रास आणि घालमेल पाहता बुलडाण्यातील इक्बालनगरमधील अख्खे कुटुंब तणावसदृश स्थितीत आले; मात्र घरातील सायराबानो नामक महिलेला एक स्त्री म्हणून असलेल्या नैसर्गिक जाणिवेतून तिच्या अडचणीची जाणीव झाली आणि घरात एकच धावपळ सुरू झाली.
लगोलग बुलडाण्यातील डॉक्टरांना कल्पना देण्यात आली आणि रात्री नऊच्या सुमारास थेट रुग्णालय गाठण्यात आले. डॉ. बी. आर. मोरे, डॉ. आर. बी. पाचरणे यांनीही हातातील सर्व कामे सोडून घाईगडबडीत रुग्णालय गाठले.
मात्र त्या अबोलीला नेमका त्रास काय हेच त्यांना प्रारंभी लक्षात आले नाही. नंतर जेव्हा त्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांनाही धक्का बसला आणि तिच्या गर्भातील चार पैकी तीन जण दगावल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आणि तिला प्रसव पीडेचा मोठा त्रास होत असल्याचेही स्पष्ट झाले.
त्यामुळे डॉक्टरांनी सिझर करण्याचा निर्णय घेतला. तब्बल पाऊण तास वेळ घेऊन डॉक्टरांनी अत्यंत संवेदनशीलते सोबतच नाजूकतेने हे सिझर केले. तेव्हा त्या अबोलीच्या पोटातील तीन बच्चे दगावलेल्या अवस्थेत निघाले, तर एक बच्चा मात्र सुखरूप होता; मात्र त्या अबोलीचा जीव वाचविण्यासोबतच तिच्या एका बच्चालाही जीवदान दिल्याचा मनस्वी आनंद डॉक्टरांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. आतापर्यंत आपण तिचा नुसता उल्लेख करीत होतो ती कुठली महिला नसून, ती एक पाळीव मांजर होती आणि प्रसव पीडेमुळे तिची तगमग होत होती. पशू रुग्णालयातील डॉक्टरांकडे नेण्यात आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आणि आता ती अबोली व तिचे ते एक पिल्लू सुखरूप आहे. शुक्रवारी सिझर झाल्यानंतर शनिवारी पुन्हा तिची तपासणी करण्यात आली. तेव्हा ती व तिचे पिल्लू सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.



-जिल्ह्याच्या इतिहासात प्रथम सिझर
४बुलडाण्याच्या इतिहासात प्रथमच एकाद्या मांजरीचे सिझर करून तिच्या पिल्लांना जीवदान देण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे या घटनेबाबत बुलडाणा शहरात उत्सुकता आणि कुतूहल आहे.


-सापावरही झाली होती शस्त्रक्रिया
४बुलडाणा जिल्ह्यात यापूर्वी २०१५ मध्ये दुचाकीचे चाक अंगावरून गेलेल्या एका सापाचा मनकाही जोडण्यात डॉक्टरांना यश आले होते. येथील पशू रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यावेळी सापाला इंजेक्शन देऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले होते. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.

 

Web Title: doctor cesarean pregnant cat buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.