वात्सल्य हरवलेल्या चिमुकल्याच्या रडण्याने डॉक्टरांचेही काळीज गहीवरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 11:06 AM2020-07-12T11:06:07+5:302020-07-12T11:06:17+5:30
आईचा आवाज ऐकण्यासाठी कासावीस झालेल्या या चिमुकल्याला बघून अख्खे सामान्य रुग्णालय गहीवरले.
- नीलेश जोशी
बुलडाणा: दोन महिन्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात आजारी असलेल्या आईची सेवा करणारा चार वर्षाचा चिमुकला दहा जुलै रोजी तिच्या जाण्याने पोरका झाला आहे. अवघ्या चार वर्षाच्या वयात मोठी समज आलेल्या या चिमुकल्याला आईस घास भरवत असतानाच ती गेल्याचे समजले आणि तिच्या पार्थिवावर हंबरडा फोडून आईचा आवाज ऐकण्यासाठी कासावीस झालेल्या या चिमुकल्याला बघून अख्खे सामान्य रुग्णालय गहीवरले.
मन हेलावून सोडणारी ही घटना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा जुलै रोजी घडली व समाजासमोर अनेक प्रश्न उपस्थित करून गेली आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी एका व्यक्तीने या महिलेस बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हा तिच्या सोबत चार वर्षाचा हा चिमुकला आणि तिच्या गर्भात वाढणारे एक बाळही होते. नियतीला कदाचीत या महिलेचे जगणे मान्य नसेल, पण गर्भातील त्या बाळाचाही जन्मानंतर अवघ्या काही दिवसात मृत्यू झाला. त्यामुळे आयुष्याचे कदाचीत गणीत चुकलेल्या त्या महिलेची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यातच प्रसुतीनंतर या महिलेच्या शरीरातील रक्तही कमी झाले. त्यामुळे आजारातून उठण्या ऐवजी ती अधिकच खालावली.
मात्र त्या काळात तिची जगण्याची उमेद होती अवघा चार वर्षाचा तिची सेवा करणारा चिमुकला. अगदी एखाद्या सज्ञान व्यक्तीप्रमाणे आजारी असलेल्या त्याच्या आईची सेवा या चिमुकल्याने केली. दररोज जेवताना पहिला घास त्याने आईला भरवला. त्यानंतरच तो जेवला. मात्र आईचे वात्सल्य नियतीने त्याच्याकडून हिरावले. दहा जुलै रोजी सैलानी येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणलेल्या या महिलेचा मृत्यू झाला. तेव्हा या चार वर्षाच्या चिमुकल्याने फोडलेला टाहो वार्डात उपस्थित असलेल्या रुग्णांसह डॉक्टरांचे काळीज हेलावून गेला. रुग्णालयातील कर्मचारी सुहास गुर्जर याला तर हा प्रसंग सांगताना अश्रूही अणावर झाले. गेल्या दोन महिन्यापासून रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारीच या चिमुकल्याला सहकार्य करत होते.
मात्र आईची सेवा केल्यानंतरही ती गतप्राण झाल्यानंतर चिमुकल्याने फोडलेला टाहो पाहता असा प्रसंग पुन्हा कुणावरही येवू नये.
माणुसकी धावली
महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यविधीचाही प्रश्न समोर आला. तेव्हा रुग्णालयातीलच कर्मचारी व डॉक्टरांनी एकत्र येत या महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याचे रुग्णालयातील डॉक्टर विजय सोळंकी यांनी सांगितले. सध्या या चार वर्षाच्या चिमुकल्याचे संगोपन रुग्णालयातील हेच कर्मचारी करत आहे. मात्र या चार वर्षाच्या चिमुकल्याचे भविष्य मात्र तुर्तास तरी अधांतरी आहे. आईच्या पार्थिवाला बिलगून रडणाºया त्या चिमुकल्याचा ह्रदय हेलावून सोडणारा हंबरडा रुग्णालयातील अनेकांच्या डोळ््यात अश्रू आणून गेला.