रेशनधान्य देत नाही, म्हणून दुकानदारच बदलून टाकला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 12:07 PM2021-07-11T12:07:11+5:302021-07-11T12:07:22+5:30
Buldhana News : धान्य पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी आल्याने राज्य शासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला करून दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सार्वजनिक वितरण योजनेंतर्गत धान्य पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी आल्याने राज्य शासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला करून दिला आहे. या पर्यायामुळे अनेकांना रेशन दुकानांचा पर्याय उपलब्ध झाला असल्याने एखादा रेशन दुकानदार रेशन देत नसल्यास किंवा त्याच्याशी पटत नसल्याने कार्डधारक दुकानदार बदलून इतर दुकानात धान्य घेत आहेत. जून महिन्यात जिल्ह्यातील १३ हजार ७१४ कार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जिल्ह्यातील कार्डधारकांना अल्पदरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. अन्न सुरक्षा योजना, दरिद्र रेषेखालील लाभार्थी अशा गटात वर्गीकरण करून लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते. या प्रक्रियेमध्ये अनेकवेळा रेशन दुकानदारांसंदर्भात तक्रारी होतात.
काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या अडचणी असतात. अशावेळी या लाभार्थ्यांना रेशनचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ हजार ७१४ ग्राहकांनी दुकानदारच बदलला आहे.