भोकरदनच्या उपद्रवी मोकाट कुत्र्यांची गिरड्यात विल्हेवाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:53 PM2019-09-10T12:53:51+5:302019-09-10T12:54:32+5:30

गिरडा परिसरात बेवारसरित्या आणून टाकण्यात आलेले मृत ८० ते ९० कुत्रे हे भोकरदन मधील असल्याची माहिती समोर येत आहे.

Dogs from Bhokardan disposal in Girda Forest in Buldhana district | भोकरदनच्या उपद्रवी मोकाट कुत्र्यांची गिरड्यात विल्हेवाट!

भोकरदनच्या उपद्रवी मोकाट कुत्र्यांची गिरड्यात विल्हेवाट!

googlenewsNext

बुलडाणा: तालुक्यातील गिरडा परिसरात बेवारसरित्या आणून टाकण्यात आलेले मृत ८० ते ९० कुत्रे हे भोकरदन मधील असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, तेथे उपद्रवी ठरत असलेल्या कुत्र्यांना ठार मारून ती आपल्या मतदार संघातील गिरडा शिवारात आणून टाकत वन्यजीव, पर्यावरण तसेच ग्रामस्थांच्या आरोग्याला वेठीस धरण्याचा हा क्लेशदायक प्रकार असल्याचा आरोप करीत ‘दाजीबा, हे वागणं बरं नव्हं !’, असा उपरोधिक टोला ही अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आठ सप्टेंबर रोजी बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. गेल्या सहा सप्टेंबर रोजी बुलडाणा तालुक्यातील गिरडा गावालगतच्या प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येथ असल्याचे समोर आले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी पाहणी केली असता ८० ते ९० मृत कुत्रे मृतावस्थेत आणून टाकल्याचे निदर्शनास आले होते. यातील दोन ते तीन कुत्री जिवंत असल्याचेही समोर आले होते. अज्ञात वाहनाद्वारे मृत कुत्र्यांची वाहतूक करून या भागात चार ठिकाणी त्यांचा ढीग करण्यात आला होता. अमानवीय पध्दतीने हा प्रकार घडवून आणला गेला होता. त्यामुळे गिरडा परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होऊन ग्रामस्थ व वन्य जीवांच्या आरोग्यालासुद्धा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी या परिसराची पाहणी करून ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत पार्टी वूईथ डिफ्रन्स म्हणवून घेणाºया एका राष्ट्रीय पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्र्याच्या भोकरदन या राजधानीतील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या इर्षेतून हा पाशवी प्रकार घडल्याचे समोर येत असल्याचे आ. सपकाळ यांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात शासकीय शासकीय दौर्यावर असताना त्यांच्या वाहन ताफ्यात आडव्या आलेले श्वान गाडी खाली जाऊन बसले होते. त्यामुळे दौºयात व्यत्य निर्माण झाला होता. त्यावर प्रशासकीय अधिकाºयांना त्यांनी खडेबोल सुनावले होते. त्यानुषंगानेच भोकरदन शहरात मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची ही मोहिम राबविण्यात आली असल्याचे समजते. या घृणास्पद कृत्याच्या अनुषंगाने मृत कुत्र्यांची शास्त्रीय पद्धतीने बुलडाणा वनविभागाने विल्हेवाट लावली आहे.

पोलिसात गुन्हा दाखल

वनरक्षक के. एन. तराळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मुक प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदीनुसार व अन्य कायद्यातील विविध कलमान्वये आठ सप्टेंबर रोजीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसही सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ढिगभर निधी ही आणून टाकावा- सपकाळ

आपल्या पक्षाच्या सहकारी मंत्र्यांनी ज्या पध्दतीने बुलडाण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, त्याचप्रमाणे आगामी काळात दाजीबांनी सुध्दा शिवभाऊ या नात्याने बुलडाणा मतदार संघातील शासन पातळीवर प्रलंबित असलेली विविध प्रकरणे मार्गी लावून भेदाभेद न करता ढिगभर निधी आपल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आणून टाकावा अशी अपेक्षाही बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.

मृत कुत्रे ही महानगर पालिका किंवा नगर पालिकेने गिरडा परिसरात आणून टाकली असण्याची शक्यता आहे. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू असून ठोस माहिती मिळालेली नाही.

- मनसक सातदिवे, पोलिस निरीक्षक, बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाणे

Web Title: Dogs from Bhokardan disposal in Girda Forest in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.