लस घेण्यापूर्वी करा रक्तदान; नंतर दोन महिने थांबावे लागणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:34 AM2021-03-16T04:34:32+5:302021-03-16T04:34:32+5:30
अशी आहे आकडेवारी दररोज किती जणांना दिली जाते लस? - ४,००० आतापर्यंत लसीकरण - ३६,४०३ जिल्ह्यात एकूण ब्लड बँक ...
अशी आहे आकडेवारी
दररोज किती जणांना दिली जाते लस? - ४,०००
आतापर्यंत लसीकरण - ३६,४०३
जिल्ह्यात एकूण ब्लड बँक - ७
दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी करा रक्तदान
१) कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर रक्तदान करता येत नाही, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्याआनुषंगाने ब्लड बँकांकडून जनजागृती करण्यात येत आहे.
२) प्रथम लसीकरणानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यापुढील २८ दिवसही रक्तदान करू नये, असे आवाहन शासनस्तरावरून करण्यात आले आहे.
जे रक्तदान करू शकतात, त्यांनी लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. या घटकात काहीजण नियमित रक्तदान करतात; तर ६० वर्षांवरील व्यक्तीकडून रक्तदान करण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने रक्तदान करू नये.
- डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा
जिल्ह्यातील अनेकांकडून स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले जाते. त्यामुळेच रक्ताची उणीव भासत नाही आणि अपघातातील जखमी, प्रसूतीदरम्यान अधिक रक्तस्राव होणाऱ्या महिलांसह गंभीर आजारातील रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांचा जीव वाचविणे शक्य होते. कोरोना लसीकरणानंतर रक्तदान करता, येणे अशक्य असल्याने काही प्रमाणात रक्ताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती ब्लड बँक संचालकांनी दिली.
कोरोना लसीकरणाआधी मी केले रक्तदान; तुम्हीही करा !
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालले आहे. दरम्यान, सुरक्षित राहण्यासाठी कोरोना लस घेतलेली आहे. त्याच्या काही दिवसांपूर्वी मी रक्तदानही केले; पण आता काही दिवस रक्तदान करता येणार नाही. लस घेतलेली नसल्यास इच्छुकांनी जरूर रक्तदान करावे, असे आवाहन लस घेतलेल्यांमधून होत आहे.