डोणगाव ग्रा.पं. भ्रष्टाचाराची चौकशी होणार!
By admin | Published: June 2, 2017 12:29 AM2017-06-02T00:29:21+5:302017-06-02T00:29:21+5:30
सीईओंचे आश्वासन : सुबोध सावजी यांचे आंदोलन स्थगित
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : डोणगाव ग्रामपंचायत तसेच नागापूर, रत्नपूर, पार्डी यासह इतर गावांतील नळ योजना, एलएडी लाइट, रस्ते सुविधा, भ्रष्टाचाराची मालिका व अनियमितताप्रकरणी १ जून रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिला होता. या आंदोलनाचा धसका घेत, ३१ मे रोजी या संपूर्ण प्रकरणात चौकशी करून कारवाईचे ठोस आश्वासन जि.प. मुकाअ एस. षण्मुखराजन यांनी दिल्याने सुबोध सावजी यांनी आंदोलन स्थगित केले.
३१ मे रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषदेच्या आवारात पोलीस बंदोबस्तात माजी मंत्री सुबोध सावजी व शैलेश सावजी यांनी जि.प. मुकाअ षण्मुखराजन यांच्या कक्षात प्रवेश करुन चर्चा केली. यावेळी जि.प.चे उपमुकाअ लोखंडे, चोपडे, राजपूत तसेच ठाणेदार हिवाळे व पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. गेल्या आठ वर्षांत डोणगाव ग्रामपंचायतने सर्वच कामात अनियमितता व कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला.
दीडशे गाळ्यांचे परवानगी न घेता बीओटी तत्त्वावर बांधकाम केले. वित्त आयोगाच्या योजनेत एलएडी लाइट खरेदी न करता १२ लाखांचा अपहार केला. डोणगाव पाणीपुरवठा योजनेत तसेच नागापूर, रत्नापूर, पार्डी गावातील नळ योजनेत भ्रष्टाचार केला. पार्डी या १८०० लोक वस्तीच्या गावात गेल्या दहा वर्षांत सहा महिलांचा विहीरीत पडून मृत्यू झाला. पाच जण जखमी होऊन त्यांना कायमचे दिव्यांगत्व आले. गावकऱ्यांना भेटीसाठी गेले तेव्हा बीडीओ, तहसीलदार यांनी गावात भेट दिली नाही, त्यामुळे गावकरी आक्रमक झाले. या प्रश्नांवर उपमुकाअ लोखंडे यांनी नळ योजनेच्या कामात पाण्याचा स्रोत नव्हता, अशी कैफियत यावेळी सावजी यांनी मांडली. यानंतर मुकाअ षण्मुखराजन यांनी या प्रकरणात ग्रामसेवकाला निलंबन करण्याची कारवाई केली. ग्रा.पं. सदस्यांना नोटिस दिली. तसेच भ्रष्टाचारप्रकरणी योग्य व ठोस कारवाईचे आश्वासन दिल्याने १ जून रोजीचे आंदोलन तूर्तास स्थगित करीत आहे, असे सांगितले.