डोणगाव मध्ये कोरोना योदध्येच कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:52 AM2021-02-23T04:52:04+5:302021-02-23T04:52:04+5:30
डोणगावमध्ये सध्या कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढले आहे. आता दररोज एक ते दोन रुग्णांची वाढ होत आहे. येथील ...
डोणगावमध्ये सध्या कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढले आहे. आता दररोज एक ते दोन रुग्णांची वाढ होत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील दोन डॉक्टर कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्याने चिंतेत वाढ झाली आहे. मात्र गावात अजूनसुद्धा कोणत्याच विभागाकडून याची दखल घेऊन उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.
डोणगाव येथे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली होती. मेहकर तालुक्यातील सर्वात पहिला कोरोना पाॅझिटिव्ह डोणगावमधेच मिळून आला होता. तर कोरोनाबाधित आणि मृत्यूचे प्रमाणदेखील येथे जास्त होते. मात्र त्या नंतर परिस्थिती सवरल्या गेली होती. अशात पुन्हा डोणगावमध्ये कोरोनाने पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कार्यरत असणारे डॉक्टर तीन दिवसांपूर्वी कोरोना पाॅझिटिव्ह आले होते. त्या नंतर २१ फेब्रुवारी रोजी येथील पुन्हा एक अधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह झाले आहेत. मात्र प्रशासन अजूनसुद्धा सुस्तच आहे.
नियमांकडे दुर्लक्ष
पोलीस प्रशासनाने मास्क न वापरणारे किंवा गर्दी करणाऱ्यांवर कोणतीच कार्यवाही केलेली नाही. आपत्कालीन परिस्थितीत गावाला कोरोनापासून दूर ठेवण्याची जबाबदारी असणारे महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासक हे देखील जनजागृती करताना दिसून येत नाही. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवायचे असेल तर कोरोनाविषयी जनजागृतीसोबत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.