निर्बंध संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 12:11 PM2021-05-16T12:11:34+5:302021-05-16T12:11:51+5:30
Buldhana News : कठोर निर्बंध येत्या काळात प्रसंगी संपतील, मात्र अशा स्थितीतही मुलांना घराबाहेर न सोडणेच बरं, अशी भावना व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुले अधिक बाधित होण्याची शक्यता राज्यस्तरीय टास्क फोर्स, आयसीएमआर व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करत आहे. जिल्ह्यात लावण्यात आलेले कठोर निर्बंध येत्या काळात प्रसंगी संपतील, मात्र अशा स्थितीतही मुलांना घराबाहेर न सोडणेच बरं, अशी भावना व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनानेही तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याची शक्यता विचारात घेता पूर्वतयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने बुलडाणा कोविड समर्पित रुग्णालयांमध्ये एक स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून, तो थेट ऑक्सिजन जनरेशन प्लांटशी जोडण्यात आला आहे. जिल्ह्यात लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची संख्या नेमकी किती हे स्पष्ट नसले तरी बुलडाणा शहरातील बालरोगतज्ज्ञांच्या रुग्णालयात जवळपास ३० लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे निदर्शनास आल्याचे स्पष्ट केले आहे. त्याअनुषंगाने आता खासगी रुग्णालयांतील डॉक्टर मिळून एक स्वतंत्र कोविड कक्ष लहान मुलांच्या इलाजासाठी उभारण्याच्या तयारीत आहे. बालरोगतज्ज्ञांना व्हॉट्सॲप ग्रुपवरही त्याबाबत सध्या चर्चा होत आहे. मोठ्या माणसाची कोरोनाची ट्रीटमेंट व लहान मुलांची ट्रीटमेंट यात बराच फरक आहे. त्या दृष्टीनेही बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेकडून काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असल्याची माहिती आहे.
लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे काय?
लहान मुलांमध्येही मोठ्या माणसाप्रमाणे तीव्र ताप येतो. डोके दुखणे, खोकला, पडसे येणे. कधी कधी संडास लागणे, वांती होणे, मळमळ होणे अशी लक्षणे असतात.
क्वचित प्रसंगी लहान मुलांची प्रकृती गुंतागुंतीचे होते. लहान मुलांना कोरोना होण्याचे कारण प्रसंगी कुटुंबाला कोरोना झाल्याचा इतिहास असणेही असते.
लहान मुलांमध्येही साधारण, मध्यम व प्रसंगी मॉडरेट लक्षणे आढळून येतात. त्यानुसार ट्रीटमेंटमध्ये बदल केला जातो.
ताप येणे, डोके, पोट दुखणे क्वचित प्रसंगी संडास लागणे, मळमळ होणे, वांती होणे अशी लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात. लहान मुलांची कोरोना चाचणीही पालकांनी न घाबरता करावी. ती त्रासदायक नसते.
- डॉ. राजेंद्र बेदमुथा,
बालरोगतज्ज्ञ, बुलडाणा