कोरोना काळात विकास कामाला निधीचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:36 AM2021-05-06T04:36:37+5:302021-05-06T04:36:37+5:30
शहरातील विविध विकास कामांसाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध करून दिला ...
शहरातील विविध विकास कामांसाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी दिली.
कोरोना संक्रमणाच्या काळात विकासची अनेक कामे स्थगित आहेत. मात्र सिंदखेडराजा शहरातील जवळपास सहा प्रभागात या निधीतून विविध विकास कामे केली जाणार आहेत. ज्यात सामाजिक सभा गृह, मंदिर सभामंडप, रस्ते, नाल्या, आदी कामे केली जाणार आहेत. शहरातील १३ कामे यात समाविष्ट असून यासाठी एकत्रित दोन कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. एवढीच रक्कम देऊळगावराजा येथेही उपलब्ध झाल्याचे ॲड. नाझेर काझी यांनी सांगितले.
गोसावी नंदनसाठी २५ लाख मंजूर झाले आहेत. येथील शेकडो वर्षांची उत्सवी परंपरा असलेल्या श्री गोसावी नंदन गणपती मंदिराच्या सभामंडपातील डॉ. शिंगणे यांनी भरीव निधी देण्याचा शब्द दिला होतो. या विकास निधीत मंदिर सभामंडपासाठी पालकमंत्री यांनी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. चारशे वर्षे जुने असलेल्या या संस्थानचा भाद्रपद उत्सव राज्यभर प्रसिद्ध आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या काम सुरू असून भविष्यात भव्य मंदिर उभे राहणार आहे.
मंदिर सभामंडपासाठी निधी दिला. भविष्यात भव्य मंदिर उभारणीचा विश्वस्त मंडळाच्या संकल्प आहे. यासाठी सर्वांनीच सहकार्य केले आहे, असे मत मंदिर समिती अध्यक्ष विलास असोलकर यांनी व्यक्त केले.