मुद्रांक शुल्कामध्ये सुट दिल्याने व्यवहारात दुपटीने वाढ- उमेश शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 10:49 PM2021-01-07T22:49:45+5:302021-01-07T22:52:18+5:30
मुद्रांक शुल्क अधिकारी उमेश शिंदे यांच्याशी साधलेला संवाद.
बुलढाणा: मुद्रांक शुल्कामध्ये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत तीन टक्के सुट दिल्याने जिल्ह्यात मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारात दुपटीने वाढ झाली आहे. कोरोना संसर्गाच्या या काळात यामुळे अर्थकारणाला चालना मिळाली आहे. त्यासंदर्भाने मुद्रांक जिल्हाधिकारी उमेश शिंदे यांच्याशी साधलेला संवाद.
मुद्रांक शुल्कामध्ये दिलेल्या सवलतीमुळे किती कोटींचा महसूल मिळाला?
मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के सुट दिल्यामुळे सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात ३२ कोटी ३१ लाख ७३ हजार ४४५ रुपयांची उलाढाल झाली. यातून महसूलही मोठ्या प्रमाणावर मिळाला आहे.
यामुळे बक्षीसपत्रांच्या संख्येत वाढ झाली का?
होय. जिल्ह्यात बक्षीसपत्रांच्या संख्येत वाढ झाली आहे. २५ टक्क्यांनी या व्यवहारांचे गेल्या तीन महिन्यात प्रमाण वाढले. प्रामुख्याने रक्ताच्या नात्यातील भाऊ, बहीण, पत्नी, पती, मुलगा, मुलगी, नातू, नात यांच्यामध्ये वर्षानुवर्षे रखडलेले व्यवहार यामुळे मार्गी लागले. विशेष म्हणजे यामध्ये अवघेय २०० रुपये मुद्रांक शुल्क व २०० रुपये नोंदणी फीच्या आधारावर हे व्यवहार झाले. त्यातही पालिका आणि जिल्हा परिषदेला अशा व्यवहारात द्यावा लागणारा १ टक्के सेसही बंद असल्याने नागरिकांनी या योजनेचा चांगला लाभ घेतला.
खरेदी खतामध्ये किती वाढ झाली?
खरेदी खताचेही व्यवहार ३० टक्क्यांनी वाढले. त्याचा फायदा मालमत्तांचे व्यवहार करणाऱ्यांनी घेतला. निम्म्यापेक्षा कमी मुद्रांक शुल्क लागत असल्याने हे व्यवहार वाढले होते. यातही पालिका आणि जिल्हा परिषदेला द्यावा लागणारा सेस बंद असल्यामुळे व्यवहार करणाऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. तसेच व्यवहारांची संख्याही दुप्पट झाली.
गृहनिर्माण क्षेत्राला काही फायदा?
गृहनिर्माण क्षेत्रातही याचा मोठा फायदा झाला आहे. प्रामुख्याने खामगाव, चिखली, बुलडाणा या शहरांमध्ये त्याचे दृश्यपरिणाम समोर आले आहेत. एका अंदाजानुसार जिल्ह्यात २०० कोटी रुपयांची गृहनिर्माण क्षेत्रात उलाढाल होत असते. मुद्रांक शुल्कामध्ये दिलेली सुट पाहता याचाही अनेकांनी लाभ घेतला.