डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलडाण्यात उसळला भीमसागर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:41 AM2018-04-15T01:41:49+5:302018-04-15T01:41:49+5:30
बुलडाणा: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त बुलडाण्यात भीमसागर उसळला होता. भीमसैनिकांच्या गर्दीने शहरातील रस्ते फुलून गेले होते. भीमरथांवर साकारण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. जयभीमच्या गगनभेदी जयघोषाने शहर दणाणले. जिल्हय़ात जवळपास ७0२ ठिकाणी या निमित्ताने मिरवणुका काढण्यात आल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८ वाजता विजयनगर येथून महिलांची मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील विविध मार्गावरून निघालेल्या रॅलीचा धम्मगिरी बौद्धविहार येथे समारोप झाला. सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल पैठणकर यांच्या हस्ते झेंडी दाखवून जयस्तंभ चौकातून सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी विनोद इंगळे, डी. आर. माळी, सिद्धार्थ आराख, प्रशांत जाधव, उदय सुरडकर, मयूर बोर्डे, नीलेश राऊत, राजेंद्र टारपे, प्रा. अनिल रिंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार विजयराज शिंदे, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, शाहू परिवाराचे संदीप शेळके यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. शहरातील २३ भीमरथ जयस्तंभ चौक येथे एकत्र आल्यानंतर हळूहळू मिरवणूक पुढे सरकली. जयस्तंभ चौक, पोलीस स्टेशन, बाजार गल्ली, सराफा लाइन, कारंजा चौक मार्गे मिरवणूक काढण्यात आली.