पेयजल योजनांच्या कामांची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:18 AM2017-11-15T01:18:31+5:302017-11-15T01:19:51+5:30
चिखली तालुक्यातील गावांना महाराष्ट्र पेयजल योजनेत सामावून घेत नागरिकांना दिलासा द्यावा, या आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मागणीची दखल पाणी पुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांनी घेतली आहे. दरम्यान, या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत नळ योजना आराखडा तयार करण्याचे तसेच सर्वच राष्ट्रीय पेयजल योजनांच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: सिंदखेडराजा मतदारसंघात सन २00६ ते २00८ या कालावधीत तब्बल ५१ राष्ट्रीय पेयजल योजनांना मंजुरी मिळून निधीदेखील मिळाला असताना आजरोजी ही गावे तहानलेली असल्याने या कामांची सखोल चौकशी होऊन भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासह या व मतदारसंघातील चिखली तालुक्यातील गावांना महाराष्ट्र पेयजल योजनेत सामावून घेत नागरिकांना दिलासा द्यावा, या आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मागणीची दखल पाणी पुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांनी घेतली आहे. दरम्यान, या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत नळ योजना आराखडा तयार करण्याचे तसेच सर्वच राष्ट्रीय पेयजल योजनांच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत.
सिंदखेडराजा मतदारसंघात सन २00६ ते २00८ या कालावधीत ५१ राष्ट्रीय पेयजल योजनांना मंजुरी मिळून निधीही मिळालेला आहे; मात्र यापैकी एकाही नळयोजनेचा फायदा संबंधित गावातील नागरिकांना झालेला नाही. यामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तसेच अनेक कामे अपूर्ण असल्याच्या तक्रारी होऊनही त्यावर कोणतीच कारवाई झालेली नसल्याची बाब आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सन २0१७-१८ च्या अर्थसंकल्पीय विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवर बोलताना ३0 मार्च २0१७ रोजी सभागृहात केली होती. या सर्व नळ योजनांची चौकशी करावी, या गावांचा समावेश महाराष्ट्र पेयजल योजनेत करून त्यांना पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी लावून धरली होती. याशिवाय चि खली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथे पाच गावांची प्रादेशिक नळ योजना पूर्ण त्वास गेलेली असताना ही योजना अनेक वर्षांपासून नादुरुस्त असल्याने यावर अवलंबून असलेल्या पाच गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुतीसाठी निधी देण्याची मागणी आ. खेडेकर यांनी केली होती. या मागण्यांची दखल घेत पाणीपुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या दालनात १३ नोव्हेंबर रोजी संबंधित विभागाचे सचिव, सहसचिव, कक्ष अधिकारी यांची बैठक बोलावली होती.
यामध्ये सिंदखेडराजा मतदारसंघातील सर्व पाणीपुरवठा योजनांची चौकशी करावी, तसा अहवाल सादर करण्याबाबतच्या सूचना ना. लोणीकर यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत या गावांच्या समावेशाबाबत तातडीने आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या.
देऊळगाव राजा येथील महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत खकडपूर्णा प्रकल्पावरून देऊळगाव राजा शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन संबंधित विभागीय अधिकार्यांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या. दरम्यान, देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव, तुळजापूर, गिरोली बु, गिरोली खु, निमखेड, वो. बावरा, प. झालटा, प. मलंगदेव या आठ कायमस्वरूपी दुष्काळी गावांचा तसेच असोला बु., उंबरखेड, जवळखेड, चिंचोली बु., बाणखेड, आळंद, गोंधणखेड, पिंपळगाव बु., रोहना, दगडवाडी या दुष्काळी दहा गावांचा खडकपूर्णा धरणावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत प्रादेशिक नळ योजनांचा समावेश करावा, अशी मागणी आ.डॉ. खेडेकर यांनी केली असता याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश ना. लोणीकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. त्यामुळे आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे.