मोताळा तालुक्यात ठिबक सिंचन क्षेत्र वाढले!
By admin | Published: March 14, 2016 01:50 AM2016-03-14T01:50:02+5:302016-03-14T01:50:02+5:30
शेती सिंचनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; पाण्याच्या बचतीसह उत्पन्नात होतेय वाढ.
मोताळा (जि. बुलडाणा): अत्यल्प पर्जन्यामुळे तालुक्यातील पाण्याची उपलब्धता कमी झालेली आहे. त्या पाण्यात अधिक क्षेत्र सिंचित करण्यासाठी व उत्पादनवाढीसाठी शेतकरी अलीकडे मोठय़ा प्रमाणात तुषार व सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करत असून, मोताळा तालुक्यात ९ हजार २३ हेक्टरवरील शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. यामुळे उत्पादन वाढीसोबत आता पाण्याचीही बचत होत आहे.
मोताळा तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत परंपरागत पद्धतीने सिंचन करून धरण, प्रकल्प, विहिरीतील पाणी थेट पाटाद्वारे पिकापर्यंत पोहोचवित होते. यामुळे पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होत होता. मात्र, मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वर्षभर सिंचन करणे शेतकर्यांना कठीण होऊन बसले. परिणामी सततच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने तालुक्यातील विहिरी जानेवारीतच तळ गाठतात. मात्र, आता शेतकरी तुषार व ठिबक सिंचन या आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत असल्याने वर्षभर सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकर्यांना वर्षभर पाण्याची उपलब्धता होत असल्याने तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन आता ठिबक सिंचनाच्या खाली आली आहे. ठिबक सिंचन अतिशय फायदेशीर ठरू लागल्याने सन २0१५-१६ पर्यंत सद्यस्थितीत तालुक्यातील ठिबक, तुषार, स्प्रिंकलरचे एकूण क्षेत्र ९0२३ हेक्टरपर्यंत गेले आहे. तालुक्यात कृषी क्षेत्र हे ७९ हजार ७२८ हेक्टर असून, यातील खरिपाचे ५३ हजार ५९४ हेक्टर तर रब्बीचे ८ हजार ५२२.४0 हेक्टर आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ६८८.६ मि.मी. आहे. ठिबक, स्प्रिंकलर व तुषारच्या माध्यमातून गहू, मका, हरभरा, भाजीपाला, कापूस, कांदा, पपई, मिरची, टमाटे अशी पिके जेमतेम पाण्याच्या आधारावर घेत आहेत. ठिबक सिंचनासाठी अनेक शेतकर्यांनी कृ षी विभागाच्या अनुदान योजनेचाही लाभ घेतला तर अनेकांनी स्वबळावर ठिबक, स्प्रिंकलर, तुषार प्रणाली राबवल्याने सद्यस्थितीत तालुक्यातील क्षेत्र ९ हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे.
शेतकरी अल्प पाण्यात शेती करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करीत आहे. परंतु तालुका कृषी विभागाकडून शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येत नाही. अनेक शेतकरी नापिकीमुळे आत्महत्या करीत आहेत. अशा शेतकर्यांना सिंचन विहिरी देताना ठिबक सिंचनाचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे. शेतकर्यांना अपेक्षित माहिती मिळत नसल्याने अनेक जण या योजनांपासून वंचित राहत आहेत.