बस पत्रा अपघातप्रकरणी चालक व वाहक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 05:46 AM2022-09-18T05:46:16+5:302022-09-18T05:46:46+5:30
मुंबई कार्यालयाला देणार अहवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलढाणा/मुंबई : मलकापूर आगाराच्या धावत्या बसचा पत्रा लागून दोघांचे हात कापले जाणे व एकास गंभीर इजा होण्याच्या प्रकरणात आता एसटी महामंडळातर्फे नागपूर नियंत्रण समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत असून या प्रकरणात संबंधित बस चालक व वाहकास तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. प्रादेशिक व्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी होत आहे. सविस्तर अहवाल मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.
मलकापूर आगाराच्या बसच्या टुलबॉक्सचा पत्रा बाहेर निघून शुक्रवारी सकाळी गणेश शंकर पवार याच्या हाताला जबर मार लागला. सोबतच विकास गजानन पांडे व परमेश्वर आनंदा सुरडकर या दोघांचे हात उखडले गेले. यातील एकाची प्रकृती नाजूक आहे. घटनास्थळी समिती सदस्यांसह जळगाव खान्देशचे विभाग नियंत्रण, बुलढाण्याचे डीटीओ, यंत्र अभियंता, डेप्युटी मॅकेनिकल इंजिनियरसह काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
सीसीटीव्ही फुटेजही तपासले
अपघातग्रस्त बसचे गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज चौकशी समितीने तपासले आहे. सोबतच घटनेच्या आदल्या दिवशी ही बस आगारात परत आल्यानंतरच्या फुटेजचीही तपासणी करण्यात आली. मात्र, दुर्घटनेचे काही फुटेज मिळते का, याचीही तपासणी समिती करत आहे.
‘त्या’ तरुणांना
नोकरी द्या
बुलडाणा जिल्ह्यात घडलेल्या एसटीच्या अपघातामध्ये हात गमावलेल्या दोन व्यक्तींना नोकरी तसेच योग्य
नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तांबे यांनी म्हटले आहे की, एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवितासोबतच रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा घटना चिंताजनक आहेत. या दोन्ही नागरिकांची कोणतीही चूक नसताना त्यांना आपला हात गमवावा लागला. जायबंदी झालेल्या या दोन्ही व्यक्तींना नोकरी व नुकसानभरपाई मिळावी.