मुंबई, पुणे ड्युटी नको रे बाबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:36 AM2021-03-31T11:36:47+5:302021-03-31T11:36:55+5:30
Drivers says No to Pune, Mumbai duty : मुंबई, पुणे ड्युटी नको रे बाबा, अशी विनवणी एसटी बसचे चालक व वाहक करताना दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या वर्षी मुंबई व पुणे शहरासह सर्वच महानगरांमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. आता गेल्या काही दिवसांपासून ही परिस्थिती पुन्हा निर्माण होत आहे. यामुळे मुंबई, पुणे ड्युटी नको रे बाबा, अशी विनवणी एसटी बसचे चालक व वाहक करताना दिसून येत आहेत.
कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून तब्बल सहा महिने एसटी बसची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत गेल्याने ऑगस्ट २०२० पासून एसटीची चाके पुन्हा एकदा फिरायला लागली. सुरुवातीला जिल्हांतर्गत वाहतुकीस परवानगी देण्यात आली. यानंतर लांबपल्ल्याच्या ठरावीक बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. कालांतराने प्रवाशांचा कल वाढल्याने एसटी बसची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. यामुळे साहजिकच चालक व वाहकांच्या ड्युटी महानगरांपर्यंत धावणाऱ्या शहरांकडे लावण्यात आल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी ही जबाबदारी निमूटपणे स्वीकारली. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने पुणे, मुंबईची ड्युटी म्हटली की नको रे बाबा, असे शब्द आपसूकच चालक व वाहकांमधून व्यक्त होतात.
एसटी चालक व वाहकांना पुणे, मुंबईची ड्युटी करताना कुटुंबाची काळजी सतावत असते. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना सतत प्रवाशांच्या संपर्कात असल्याने त्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता सरकारने एसटी कामगारांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करावी व कर्मचारीबाधित झाल्यास उपचारांचा खर्च उचलावा.
- प्रदीप गायकी, प्रदेश सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना