पाडव्याच्या खरेदीवर दुष्काळाचे सावट : बाजारपेठेत ग्राहकांची तुरळक गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 05:34 PM2019-04-05T17:34:42+5:302019-04-05T17:38:16+5:30

बुलडाणा : गुढीपाडव्याच्या खरेदीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे सावट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. पाडव्याच्या मुहुर्तावर सोने, चांदी, वाहन, कपडे, इलेक्टॉनिक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करणाºया ग्राहकांमध्ये निरुत्साह आहे. गतवर्षीच्या तुलनेत बाजारपेठेतील वर्दळ मंदावली आहे.

Drought shadow on Gudhi padwa purchasing : A small crowd of customers in the market | पाडव्याच्या खरेदीवर दुष्काळाचे सावट : बाजारपेठेत ग्राहकांची तुरळक गर्दी

पाडव्याच्या खरेदीवर दुष्काळाचे सावट : बाजारपेठेत ग्राहकांची तुरळक गर्दी

Next

- सोहम घाडगे

बुलडाणा : गुढीपाडव्याच्या खरेदीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे सावट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. पाडव्याच्या मुहुर्तावर सोने, चांदी, वाहन, कपडे, इलेक्टॉनिक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करणाºया ग्राहकांमध्ये निरुत्साह आहे. गतवर्षीच्या तुलनेत बाजारपेठेतील वर्दळ मंदावली आहे. साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त अनेकजण नवीन वस्तू खरेदी करतात. यामध्ये घर, वाहन, सोने, चांदी, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीकडे जास्त कल असतो. मात्र नोटंबदीमुळे बाजारात आलेले मंदी अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यातच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने बाजार मंदावला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने उत्पादनात कमालीची घट आली. शेतकºयांचे नगदी पीक सोयाबिनला चांगला भाव नाही. कापसाची परिस्थितीही तशीच आहे. शेतात लावलं ते पिकलं नाही. जितकं पिकलं त्याला बाजारात चांगला भाव नाही. यामुळे बळीराजाची चोहोबाजूंनी कोंडी झाली. शेतमालाला भाव नसल्याने हाती पैसा नाही. घरात पैसा नसल्याने आपसुकच खरेदीचा उत्साह कमी झाला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जिल्ह्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारपेठेत मंदी आहे. त्यामुळे छोटे मोठे व्यावासायीक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर काही दिवसांकरिता बाजारपेठेला नवसंजिवनी मिळेल, अशी व्यावसायिकांना अपेक्षा होती. एप्रिल महिना उजाडताच गुढीपाडव्याकडे त्यांच्या नजरा लागल्या होत्या. परंतू त्यांच्या अपेक्षांच्या तुलनेत बाजारात खरेदीसाठी गर्दी नाही. सहाजिकच व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची विक्री होत आहे. परंतू चैनीच्या वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल कमी आहे. असे असले तरी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर खरेदी करणारे अनेक जण आहेत. त्यादृष्टीने विविध साहित्य बाजारात दाखल झाले आहे. ग्राहकांची पसंती लक्षात घेता सराफा व्यावसायिकांनी दागिन्यांचे विविध बॅ्रण्ड उपलब्ध केले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या व्यावसायिकांनी विविध प्रकारच्या आॅफर ठेवल्या आहेत.

नोटबंदीमुळे आलेली मंदी अजूनही कायम आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदीसाठी फारशी वर्दळ नाही. निवडणूक व दुष्काळी परिस्थितीचा खरेदीवर परिणाम जाणवत आहे. सध्या तरी बाजारपेठ सुस्तावलेली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोने- चांदी खरेदीसाठी शनिवारी गर्दी होईल.

- दीपक वर्मा, सराफा व्यावसायीक.

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर यंदा बांधकाम व्यवसायात फारशी तेजी नाही. घर खरेदीसाठी विचारणा होते मात्र खरेदीदार नाहीत. नोटबंदीनंतर रिअल इस्टेटवर झालेला परिणाम अजूनही कायम आहे. कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे व्यवसायाला फायदा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतू तसे झालेले दिसत नाही.

- संदीप शेळके, बांधकाम व्यावसायीक.

 गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आॅटोमोबाईल व्यवसायात मंदी आहे. नोटबंदी, इन्शुरन्स, आरटीओ खर्च यामुळे वाहनांच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचाही परिणाम वाहनखरेदीवर होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहन विक्री कमी झाली आहे.

- संजय गाडेकर, वाहन विक्रेते.

Web Title: Drought shadow on Gudhi padwa purchasing : A small crowd of customers in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.