जिल्ह्यातील १४१९ गावांत दुष्काळी परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:42+5:302021-01-08T05:52:42+5:30
जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मूग, उडीद या पिकांचे अतिपावसाने नुकसान झाले होते. नदीकाठच्या भागात पूर आल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून ...
जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मूग, उडीद या पिकांचे अतिपावसाने नुकसान झाले होते. नदीकाठच्या भागात पूर आल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. दरम्यान, सोयाबीन पीक चांगले असल्याने शेतकऱ्यांना या पिकाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असतानाच अति पाऊस झाला, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोंगून टाकलेले सोयाबीन भिजले. काहींच्या सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या, तर अनेकांच्या सोयाबीनच्या पिकाला काेंब आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीनंतर प्रशासनाकडून तातडीने सर्व्हे करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ मधील अंतिम पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ हजार ४१९ गावांची ५० पैशांच्या आत अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे आली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.
यांना मिळतो लाभ
दुष्काळ जाहीर केल्यानंतर राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्त गावांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध सवलती देण्यात येतात. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषांत शिथिलता आदी लाभ देण्यात येतो.