औषधींची विक्री ठप्प, व्यावसायिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 11:48 AM2020-11-06T11:48:22+5:302020-11-06T11:48:42+5:30
Khamgaon News औषधी पडून राहण्याची शक्यता असतानाच उत्पादक कंपन्यांनी ते परत घेण्यास नकार दिला आहे.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सर्वत्र कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असतानाच त्यावर उपाय म्हणून वापरल्या जाणारी औषधे विक्रेत्यांनी मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवली. आता रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने त्या औषधांची खरेदी मंदावली. त्यामुळे औषधी पडून राहण्याची शक्यता असतानाच उत्पादक कंपन्यांनी ते परत घेण्यास नकार दिला आहे.
त्यातच केवळ सहा महिन्यांच्या मुदतीपर्यंतच वापर योग्य असल्याने ती औषधे फेकण्याची वेळ विक्रेत्यांवर येण्याची भीती व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे.
राज्यातील सर्वच शहरांमध्ये औषध विक्रेत्यांनी कोरोना विषाणू उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्या. शहरातील रूग्णांची गैरसोय होऊ नये, तसेच त्यातून व्यवसायही व्हावा, या हेतूने उत्पादक कंपन्याकडून औषधे खरेदी केली.
त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे या औषधांची मागणी घटली आहे. औषध विक्रेत्यांकडे या औषधांचा साठा आता शिल्लक राहण्याची शक्यता आहे. बुलडाण्यातील जेनरीक मेडीकल स्टोअर्समध्येही अशीच स्थिती असल्याचे निदर्शनास येत आहे.
जिल्ह्यात रेमिडिसिव्हर, टँबिफ्लूचा साठा
बुलडाणा जिल्ह्यातील विक्रेत्यांकडे टँबी फ्लू टँबलेटच्या २००० स्ट्रीप, तर रेमिडिसिव्हर (प्रत्येकी ६) लसीच्या ७०० ते ८०० पँक पडून आहेत. त्याची मागणीच नसल्याने व्यावसायिकांनी त्यावर गुंतवलेली रक्कम अडकली आहे.